औंध, बाणेर, बालेवाडीचा बदलणार चेहरा

Smart-City
Smart-City

पुणे - स्मार्ट सिटीअंतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडीत २७ किलोमीटरचे ‘स्मार्ट स्ट्रीट’, तसेच मोकळ्या जागांचा वापर नागरिकांच्या उपक्रमासाठी व्हावा, यासाठी प्लेसमेकिंगच्या चार प्रकल्पांचे काम १५ मे पासून सुरू होणार आहे. तसेच, ट्रान्स्पोर्ट हब आणि ई-कनेक्‍टिव्हिटीमुळे येत्या वर्षात औंध, बाणेर आणि बालेवाडीचा चेहरा-मोहरा बदलला जाणार आहे.  

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ३२५ कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून, १५ मे दरम्यान या कामांचा प्रारंभ होणार आहे. ‘स्मार्ट स्ट्रीट’ उपक्रमातंर्गत औंधमधील दीड किलोमीटर स्मार्ट रस्ता साकारला आहे.

पादचारी आणि सायकलस्वारांना उपयुक्त असलेल्या स्मार्ट स्ट्रिटच्या धर्तीवर आता २७ किलोमीटरचे रस्ते साकारले जातील, अशी माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली.

तर, बाणेरमध्ये ट्रान्स्पोर्ट हब आणि ई-कनेक्‍टिव्हिटीचेही प्रकल्प आता कार्यान्वित होत आहेत. तसेच ई-बस, ई-रिक्षा आणि बीआरटीवर भर देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. 

१५ मे पासून सुरू होणारी कामे
- स्मार्ट स्ट्रिट -
- १६.५ किलोमीटर - १९५ कोटी - बालेवाडी
- १०.०२ किलोमीटर - ९५ कोटी - बाणेर 
- ०.०८ किलोमीटर - १५.८९ कोटी - औंध 
- प्लेसमेकिंग 
- ४ प्रकल्प- २.७२ कोटी - बाणेर आणि बालेवाडी

ई-कनेक्‍टिव्हिटी -
या उपक्रमांतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडीमध्ये ई-कनेक्‍टिव्हिटी निर्माण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सुमारे २०० स्मार्ट पोल उभारण्यात येतील. सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतुकीसाठी संगणकीकृत प्रणाली, बीआरटीसाठी माहिती तंत्रज्ञान प्रणालीचे जाळे या पोलच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या पोलमधून केबल्सही जाऊ शकतील. त्यामुळे रस्त्यांची पुन्हा पुन्हा खोदाई करावी लागणार नाही. मोबाईल कंपन्या, गॅस कंपन्या, महावितरण यांच्यासाठी या विशेष व्यवस्था असतील. तसेच, वाय-फायचे ३५ टॉवर औंध, बाणेर आणि बालेवाडीमध्ये उभारण्यात येणार आहेत. सुमारे ४२० कोटी रुपयांचा हा प्रकल्प बांधा- वापरा- हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला खर्च येणार नाही व कायमस्वरूपी उत्पन्नही मिळणार आहे. १५ मे च्या सुमारास याबाबतचा निर्णय होईल.  

१०० ई-बस, २४ किलोमीटरची बीआरटी 
स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक लवकरच होणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात किमान १०० इलेक्‍ट्रॉनिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. या भागात २६ किलोमीटरची बीआरटी कार्यान्वित होईल. त्यात ५४ बसस्थानके असतील आणि त्यांना जोडण्यासाठी १०० ई-रिक्षांची खरेदी करण्यात येईल. त्यांचे प्रवासी भाडे माफक असेल, त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडल्यावर ई-रिक्षाच्या माध्यमातून बीआरटीपर्यंत पोचून इच्छित स्थळी जातील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली. 

औंध, बाणेर, बालेवाडीचा विकास कसा असावा?
आपल्या सूचना फेसबुक आणि ट्विटरवर मांडा 
#smartpune हॅशटॅगवर
ई- मेल करा webeditor
@esakal.com वर

ट्रान्स्पोर्ट हब 
बाणेरमध्ये ११ एकर जागेत ट्रान्स्पोर्ट हब उभारण्यात येणार आहे. त्यात पीएमपीआरडीएच्या मेट्रोसाठी स्थानक असेल. तसेच, एसटी आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससाठी स्थानक उभारण्यात येणार आहे. या हबमधून बीआरटीची सेवाही सुरू करण्याचे नियोजन आहे. सुमारे १२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, सुमारे दोन ते तीन वर्षांत पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी पहिल्या टप्प्यात आराखडा तयार करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित संस्थेची निवड करून १५ मे पासून काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com