मुख्यमंत्री महोदय, अलिबाबाची गुहा खोदून काढा 

अविनाश चिलेकर
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

पिंपरी-चिंचवड महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार, चराऊ कुरण. चाळीस वर्षांत इथे डोंगराएवढा भ्रष्टाचार झाला. आजवर एकही महाभाग कधी जाळ्यात आला नव्हता. पावलापावलावर खादाड मंडळी बसलेली. आजवर त्यांना हात लावायची कोणाचीही हिंमत झाली नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार, चराऊ कुरण. चाळीस वर्षांत इथे डोंगराएवढा भ्रष्टाचार झाला. आजवर एकही महाभाग कधी जाळ्यात आला नव्हता. पावलापावलावर खादाड मंडळी बसलेली. आजवर त्यांना हात लावायची कोणाचीही हिंमत झाली नाही.

कारण, "सारे मिळून खाऊ' हा मंत्र होता. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या मदतीने या गंगेत हात धुऊन घेतले. अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने महापालिका अक्षरशः लुटली, बरबाद केली. करदात्यांच्या तिजोरीवर दरोडे टाकले. पाच पिढ्यांचे कल्याण केले. आजवर भ्रष्टाचार सिद्ध होत नव्हता. या वेळी प्रथमच पुराव्यांसह तो सिद्ध झाला. "सकाळ'ने प्रथम विठ्ठल मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचे स्टिंग ऑपरेशन केले. ते महापालिका प्रशासनाने प्रांजळपणे मान्य केले. नंतर सांगवी स्मशानात बसविलेल्या गॅस दाहिनीतही तिप्पट घोटाळा झाल्याचे छापले. तेव्हा अनेकांचे डोळे पांढरे झाले. आता चौकशी समितीनेच 404 पानांचा अहवाल दिला. त्यात तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मान्य केले. आता याला गैरव्यवहार म्हणा, अनियमितता म्हणा, घोटाळा म्हणा, की भ्रष्टाचार. करदात्यांची कोट्यवधींची लूट झाल्याचे कबूल केले, हे महत्त्वाचे. 

विरोधी पक्षांचा आवाज बनलेल्या नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी निर्भीडपणे या प्रकरणाचा छडा लावला. पाठपुरावा केला, हे सत्य आहे. ही दोन उघडकीस आलेली प्रकरणे. अशी शेकडो प्रकरणे आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील हायपरबोलिक ऑक्‍सिजन थेरपी (एचबीओटी) मशिन 70 लाखांचे पावणेतीन कोटींना खरेदी केल्याचे प्रकरणसुद्धा डोळ्यात अंजन घालणारे होते. राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. आजवरच्या अशा सर्व प्रकरणांचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. 

अबब!... पाचपटीत भ्रष्टाचार 
सांगवी स्मशानातील गॅस दाहिनीत भ्रष्टाचार झाला. निविदेत तडजोड झाली. ठेकेदार, अधिकारी आणि काही राजकारणी यांनी संगनमत केले. अवघ्या 30 लाखांचे हे मशिन होते, ते 52 लाखांना खरेदी करण्याचा प्रयत्न होता. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तो डाव हाणून पाडला. स्पष्ट नकार दिला. त्यामुळे काही नगरसेवकांनी त्यांचा उद्धार केला. डॉ. परदेशी यांची बदली होताच तिच मशिनरी तब्बल एक कोटी 36 लाखांना खरेदी केली. तीन वर्षांपूर्वीची ती चोरी पचली. त्यामुळे सरावलेल्या मंडळींनी पाच गॅस दाहिनी खरेदीचा डाव आखला.

ठेकेदार, अधिकारी आणि नगरसेवकांची तिच टोळी होती. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा प्रयत्न होता. दिल्ली महापालिकेने अशाच पद्धतीची पाच मशिनरी अवघ्या दोन कोटींत खरेदी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यासाठी दहा कोटी द्यायची तयारी दाखवली. म्हणजे तब्बल पाचपटीत लूट होती. नगरसेविका सावळे यांनी हा डाव उधळला, म्हणून फेरनिविदा काढल्या. तिथेही सव्वा कोटीप्रमाणे खरेदीचा विचार होता. आता चौकशीत सत्य बाहेर आले. पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या साथीदारांनी प्रारंभी मखलाशी केली. आता त्यांची बोलती बंद झाली. समितीने आर्थिक दायित्व निश्‍चित करून व्याजासह पैसे वसुलीची शिफारस केली आहे. ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून त्याला काळ्या यादीत टाकायची शिफारस आहे. अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होईल. निलंबनही होईल. खरे तर, ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना खडी फोडायला पाठविले पाहिजे. आजवर किती लुटले, त्याचा हिशेब मांडण्यासाठी या लोकांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविली पाहिजे. त्याशिवाय पुढचा भ्रष्टाचारी सरळ होणार नाही. 

महापालिकेची चौकशी करा 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपविण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. भ्रष्ट मंडळींना धडा शिकविण्यासाठी त्यांनी काळा पैसा खणून काढला. देशातील तमाम युवक, मध्यमवर्गाने त्यांची पाठराखण केली. पैसे खाणाऱ्यांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ही प्रवृत्ती संपविली पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला या वाळवीने पोखरले आहे. निवडणुकीचे राजकारण येईल, जाईल. शहराचे आर्थिक नुकसान कोणी करत असेल, तर त्यांना सजा झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा त्या मताचे आहेत. मोदी जाहीरपणे सांगतात, "मी खाणार नाही आणि कोणाला खाऊही देणार नाही'. पिंपरी-चिंचवड महापालिकेत "आम्ही सर्व मिळून खाऊ आणि तुम्हालाही खाऊ घालू', असा कार्यक्रम अखंड सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातले, म्हणून दोन प्रकरणांवर प्रकाश पडला. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूएरएम) झोपडपट्टी पुनर्वसन, स्वस्त घरकुल, पवना जलवाहिनी, भुयारी गटार, पावसाळी गटार, बीआरटी, नदी सुधार, सर्व उड्डाण पूल, अशा कामांची सखोल चौकशी करा. अब्जावधींचा गफला सापडेल. कारवाई झालीच तर करदाते आणि सामान्य नागरिक तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतील. येथील अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी नेस्तनाबूत करा. सर्व पक्षांत अनेक चांगले नगरसेवक, कार्यकर्ते आहेत. ते सर्व एकत्र आले, तरी येथील भ्रष्टाचार संपेल. घोडेमैदान जवळ आहे.