जेव्हा ‘जिवंत’ होतात बाबासाहेबांच्या स्मृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

या स्पर्धेतून मला बाबासाहेबांना जाणून घेणे शक्‍य झाले. वंचित समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी काम केले. मला त्यांची भूमिका साकारताना खूप आनंद वाटला. मी अनेक दिवस या स्पर्धेची तयारी करत होते. मला वाटतं, बाबासाहेबांना दलित समाजापुरते सीमित ठेवू नये.
- भूमिका घोरपडे (७ वीतील एक विद्यार्थिनी स्पर्धक, अंमळनेर)

पुणे - ‘मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही !’... ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्यायल्यानंतर माणूस गुरगुरायला लागतो’... ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा !’... ही अजरामर वाक्‍ये कुणाची आहेत, हे वेगळे सांगायची एरवी काही आवश्‍यकताच नाही. पण, गुरुवारी हीच सारी वाक्‍ये वेगळ्या स्वरूपात पुढे आली होती. ही वाक्‍ये उच्चारली जाताना वेशभूषाही तीच होती आणि त्यांतील विचारगर्भताही तशीच... शैलीसुद्धा त्या महामानवापर्यंत स्वतःला पोचवू पाहणारी... फरक फक्त एवढाच, की हे बोलत होते ते काही उत्साही आणि आत्मविश्‍वासाने भरलेले शालेय विद्यार्थी !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने ७ ते १४ वयोगटातील बालकांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध वेशभूषा व संवाद सादरीकरण’ या विषयावर ‘बार्टी’ संस्थेतर्फे गुरुवारी एका राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हे आगळेवेगळे दृश्‍य आणि सादरीकरण पाहायला मिळाले. स्पर्धेत सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांशी ‘सकाळ’ने संवाद साधत त्यांना बाबासाहेब आंबेडकर साकारताना कसे वाटले, याविषयी जाणूनही घेतले.

बाबासाहेबांनी आपले अवघे आयुष्य ज्या विचारांसाठी वेचले, असे त्यांचे काही विचार व संदेश संवादांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी सादर केले. या वेळी महत्त्वाची छाप पडली ती विविध पोशाखांची. बाबासाहेब त्यांच्या आयुष्यात दिमाखदार वेशभूषेस महत्त्व देत असत. त्यांची विविध वेशभूषांतील छबी विशेष छाप पाडून जात असे. त्यांचे असेच काही पेहराव आज या विद्यार्थ्यांनी परिधान केल्याचे देखणे चित्र पाहायला मिळाले. सूट, बूट, कोट, टाय, धोतर, टोपी, जोधपुरी अशा विविध पेहरावांत विद्यार्थी बाबासाहेबांचे विचार मांडत होते.

Web Title: B R Ambedkar Memorial