भिगवण-राजेगाव रस्त्याची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

भिगवण - भिगवण ते राजेगाव या सुमारे दहा किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण झालेल्या या रस्त्यावर कुठेच डांबर शिल्लक राहिलेले नसून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.

भिगवण ते राजेगाव रस्ता हा दौंडच्या पूर्व भागातील राजेगाव, वाटलुज, नायगाव; तसेच भिगवण स्टेशन येथील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या रस्त्यावरून दौंडच्या पूर्व भागातील लोक बाजारपेठेच्या निमित्ताने भिगवणला ये-जा करतात. दूध उत्पादक शेतकरी; तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी नियमितपणे या रस्त्यावरून भिगवण व बारामती ये-जा करतो. शाळेच्या निमित्ताने या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते; परंतु दोन वर्षांपूर्वी राजेगाव येथून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक झाल्यामुळे रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी राजेगाव, वाटलुज व दौंडच्या पूर्व भागातील नागरिकांकडून होत आहे.

राजेगाव येथील प्रवीण लोंढे म्हणाले, ""भिगवण ते राजेगाव हा रस्ता दौंडच्या पूर्व भागातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या रस्त्यावरून दूध, भाजीपाला यांची नियमित वाहतूक होत असते. शालेय विद्यार्थ्यांकडूनही रस्त्याचा वापर होत आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्याची आवश्‍यकता आहे.''

Web Title: Bad condition of Bhigwan-Rajegaon Road