'बालेवाडी क्रीडा संकुलातील गैरव्यवहाराची चौकशी करू '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पुणे - म्हाळुंगे - बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेल्या गैरव्यवहाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी दिले. मेधा कुलकर्णी यांनी याबाबत प्रश्‍न विचारला होता. 

या क्रीडा संकुलाचे 2013 ते 2016 या तीन वर्षाचे आर्थिक निरीक्षण झाले नसल्याबाबत कुलकर्णी यांनी तारांकित प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, ""सनदी लेखापालामार्फत 2008-09 ते 2013-14 या कालावधीतील लेखा परीक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील वर्षांचे लेखा परीक्षण केले जाईल.'' 

तावडे म्हणाले, ""क्रीडा संकुलात पूर्वी लग्नसमारंभ होत असत. त्यामुळे संकुलाची दुरवस्था होत होती. दोन वर्षांपासून असे कार्यक्रम बंद केले आहेत. क्रीडा संकुलाचा कारभार चांगल्या प्रकारे व गतिमान होण्यासाठी या संकुलाचे कामकाज क्रीडा विद्यापीठाच्या धर्तीवर नेण्याचा सरकारचा मानस आहे. त्याला स्वायत्तता देण्यात येईल.'' 

जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर एकच अधिकारी पंधरा वर्षे कार्यरत असल्याची तक्रार कुलकर्णी यांनी केल्यानंतर, त्या अधिकाऱ्याच्या बदलीचे संकेत तावडे यांनी दिले.