विचारांच्या आधारे एकत्र आलो, तरच परिवर्तन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - ""आपण जातीच्या, पदाच्या आधारे एकत्र येतो; पण विचारांच्या आधारे एकत्र येत नाही. जेव्हा आपण विचारांच्या धाग्याने एकत्र बांधले जाऊ, तेव्हाच समाजात खरे परिवर्तन होईल,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी व्यक्त केले. 

पुणे - ""आपण जातीच्या, पदाच्या आधारे एकत्र येतो; पण विचारांच्या आधारे एकत्र येत नाही. जेव्हा आपण विचारांच्या धाग्याने एकत्र बांधले जाऊ, तेव्हाच समाजात खरे परिवर्तन होईल,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी व्यक्त केले. 

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान आयोजित अठराव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात डॉ. कोत्तापल्ले यांना "प्रा. रा. ग. जाधव साहित्य साधना पुरस्कार', तर खडकी शिक्षण संस्थेला "मूल्यसाधना पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या वेळी लेखक डॉ. मनोहर जाधव, संमेलनाध्यक्ष प्रकाश रोकडे, संमेलनाच्या माजी अध्यक्षा अश्‍विनी धोंगडे, स्वागताध्यक्ष विजय ताम्हाणे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विकास आबनावे उपस्थित होते. 

कोत्तापल्ले म्हणाले, ""आपण स्वतःला परिवर्तनवादी म्हणवतो; पण आपल्या मित्रांची नावे पहिली, तर ती आपल्याच जातीतील असतात. आपण जातीच्या बाहेर जात नाही. मग परिवर्तन होणार कसे? विचारांच्या आधारे एकत्र येऊन हे चित्र बदलायला हवे.'' 

धोंगडे म्हणाल्या, ""स्त्रियांना मंदिरात प्रवेश देणे ही चांगली बाब आहे; पण यावरून स्त्री-पुरुष समता प्रस्थापित झाली, असे म्हणता येणार नाही. दबलेला आवाज व्यक्त होत आहे; पण महिलांमध्येही अदृश्‍य भिंती आहेत. उच्च-नीच असे भेद आहेत. ते बाजूला टाकून भगिनी-भावाने एकत्र यायला हवे.'' 

शाहू-फुले-आंबेडकरांनी दिलेले समता आणि मूल्याधिष्ठित समाजरचनेचे विचार रुजविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे, अशा भावना रोकडे यांनी व्यक्त केल्या. 

लेखकाने कच खाऊ नये 
""लेखकाला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. राजकीय विषयावरही त्याने बोललेच पाहिजे. प्रत्येक विषयावर लेखनातून भूमिका घेता आली पाहिजे. त्याने कच खाता काम नये. लेखकाला सामाजिक भान, वैचारिक स्पष्टता असली पाहिजे, असे सांगून डॉ. मनोहर जाधव म्हणाले, ""जात ही मोठी अडचण असतानाही "जाती संपल्या म्हणजे देश संपेल', असे लेखकाने म्हणणे चुकीचे आहे.''