बारामतीचे तूर खरेदी नव्हे, तूर रिजेक्ट केंद्र!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

शासनाला तूर खरेदी करायचीच नव्हती. फक्त शेतकऱ्यांचे लक्ष विचलित व्हावे व त्यांचा रोष कमी व्हावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे नाटक करण्यात आले आहे. अत्यल्प तूर खरेदी करायची आणि बव्हंशी तूर निकृष्ठ असल्याचा शिक्का लावून माघारी लावायची असा प्रकार सुरू आहे

बारामती - बारामतीत 22 मे पासून शासनाने तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू केले खरे, मात्र गेल्या दोन दिवसांत तूर घेण्यापेक्षा ती नाकारण्याचेच प्रमाण अधिक राहिल्याने आज (गुरुवार) संतप्त शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करीत हे तूर खरेदी नव्हे तर तूर रिजेक्ट केंद्र असल्याची टिका केली.

राज्यातील इतर केंद्रांप्रमाणेच बारामतीतही बाजार समितीच्या आवारात नाफेड व मार्केटींग फेडरेशनने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केले. हे केंद्र सुरू करताच शेतकऱ्यांची गर्दी या केंद्रावर झाली. मात्र बुधवारी तूर चांगल्या प्रतीची असूनही तूर नाकारल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे या खरेदी केंद्रावर शेतकरी व नाफेड, मार्केटींग फेडरेशनच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले. दुसरीकडे आज सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची तूर नाकारल्याने शेतकरी चिडले. आज दुपारपर्यंत 16 शेतकऱ्यांनी तूर घेऊन आल्याचे नमूद केले होते. त्यापैकी प्रतिनिधींनी तपासणी केलेल्या 10 जणांपैकी 6 जणांची तूर नाकारण्यात आली. ही तूर निकृष्ठ असल्याचे कारण नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यावरून शेतकऱ्यांनी जाब विचारला असता नाफेडचे प्रतिनिधी एस.आर. गायकवाड यांनी तूरीच्या खरेदीतील निकष अधिक कठोर करण्यात आले असून थोडी जरी तूर सुरकुतलेली किंवा दुय्यम दर्जाची असेल, भुंगा लागलेला असेल तर तो नाकारण्याचे वरूनच आदेश असल्याचे स्पष्ट केले. या नाकारण्याच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सायलो मशीनच्या परिसरात गोंधळ केला.

मालोजी जामदार, सुनील उदावंत, अनिल उदावंत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, संचालक राजेंद्र बोरकर व इतरांनी या शेतकऱ्यांची समजूत काढली. 

दरम्यान, ``शासनाला तूर खरेदी करायचीच नव्हती. फक्त शेतकऱ्यांचे लक्ष विचलित व्हावे व त्यांचा रोष कमी व्हावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे नाटक करण्यात आले आहे. अत्यल्प तूर खरेदी करायची आणि बव्हंशी तूर निकृष्ठ असल्याचा शिक्का लावून माघारी लावायची असा प्रकार सुरू आहे,``  अशी टीका बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर यांनी केली.
 
एवढी घट कशी?
लासुर्णे येथील हरिदास भोसले व द्वारका भोसले या शेतकरी दांपत्याने आज येथे सर्वांना भंडावून सोडले. अगोदर स्वतंत्रपणे 34 व 16 अशी 50 पोती वजन करून येथे दिली होती. पैसे मिळताना मात्र 33 पोत्यांचे व 15 पोत्यांचेच मिळाले. आमची प्रत्येकी एक पोती कोणी खाल्ली? असा सवाल त्यांनी केल्यावर तेथे तणाव निर्माण झाला. अगोदरच तूर रिजेक्ट केल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी मग त्यांची बाजू उचलून धरली. व 15 पोती दिल्यानंतरही 1 पोते कमीच आढळून आल्याबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले.