दौंड - बारामती रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पुढील महिन्यात सुरु

मिलिंद संगई
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

दौंड बारामती या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिली असून त्याच्या निविदाही निघाल्या आहेत. पुढील महिन्यापासून हे काम सुर करणार असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितल्याचे सुळे यांनी या प्रसंगी सांगितले. 
दरम्यान बारामती रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नवीन गेट तयार करणे, नवीन फलक लावण्याच्या कामाबाबतही त्यांनी सूचना दिल्या

बारामती - दौंड ते बारामती या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पुढील महिन्यात सुरु होणार असून त्या साठी रेल्वेने 45 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आज (बुधवार) त्यांनी बारामती रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली व रेल्वेच्या अधिका-यांना सूचना दिल्या. 

दौंड बारामती या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिली असून त्याच्या निविदाही निघाल्या आहेत. पुढील महिन्यापासून हे काम सुर करणार असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितल्याचे सुळे यांनी या प्रसंगी सांगितले. 
दरम्यान बारामती रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नवीन गेट तयार करणे, नवीन फलक लावण्याच्या कामाबाबतही त्यांनी सूचना दिल्या. बारामती रेल्वे स्थानकाच्या हद्दीतून सेवा रस्ता जाणार असून त्याच्या मंजूरीसाठीची फाईल लवकर मंजूर होईल, असेही त्यांनी सांगितले. रेल्वेच्या मैदानावरील  असलेली पोलिस चौकी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर हलविण्यात येणार असून मैदानावरील पोलिस चौकीची इमारत पाडून मैदान अधिक मोठे करण्यात येणार आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. बारामती रेल्वे स्थानकानजिक असलेला मालधक्का हलविण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे मात्र लगेचच हा धक्का हलविणे अवघड असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मात्र तरीही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

बारामतीहून रात्री मुंबईला जाण्यासाठी एक बोगी सिध्देश्वर एक्स्प्रेसला जोडावी अशीही मागणी या वेळी करण्यात आली. त्या दृष्टीने चर्चा करुन काय करता येईल त्याचा पाठपुरावा पुढील बैठकीत केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या पुढील काळात दर दोन महिन्यांनी रेल्वे स्थानकावर येऊनच पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. बारामती रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. अशीच स्वच्छता दररोज असायला हवी असे त्यांनी सुचविले. रेल्वेच्या वतीने स्टेशन प्रबंधक पी.एम. गोटमारे, पी.यु. पाटील, आर.के. सिन्हा यांनी सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले. 
चौकट- विद्युतीकरणानंतर गती येणार

बारामती दौंड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बारामती दौंड हे अंतर आणखी वेगाने पूर्ण करता येणे रेल्वेला शक्य होणार आहे. त्या मुळे विद्युतीकरण हा रेल्वेच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा समजला जात आहे.