वृध्दाश्रम बंद होतील तेव्हा होईल भारतीयांचे जीवन धन्य- पुलकसागरजी

मिलिंद संगई
रविवार, 6 ऑगस्ट 2017

अश्रू अनावर...
पुलकसागरजी महाराजांच्या आजच्या प्रवचनादरम्यान असंख्य स्त्री पुरुषांना त्यांचे विचार ऐकल्यावर अश्रू अनावर झाले. विशेषतः वयोवृध्द भाविकांना अनेकदा आपल्या भावना आवरणे कठीण गेले. 

बारामती : वृध्दाश्रम हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे, ज्या दिवशी या देशातील सर्व वृध्दाश्रम बंद होतील त्या दिवशी प्रत्येक भारतीयाचे जीवन धन्य होईल. मातापित्यांची सेवा करण्यातच या जीवनाची धन्यता आहे, अशा शब्दांत राष्ट्रसंत 108 पुलकसागरजी महाराजांनी आज संदेश दिला. 

चातुर्मासानिमित्त बारामतीतील दिगंबर जैन बांधवांच्या वतीने आयोजित ज्ञानगंगा महोत्सवात आज आई नसती तर...या विषयावर पुलकसागर महाराजांनी विचार मांडले. जे आई वडील जिवाचे पाणी करुन आपल्याला लहानाचे मोठे करतात त्याच आई वडीलांना त्यांच्या वृध्दापकाळात हिन वागणूक देणे ही आपली संस्कृती नाही, असे ते म्हणाले. 

ज्या मुलांना इतर व्यापातून आपल्या वयोवृध्द आई वडीलांसाठी वेळ नाही त्यांच्या सारखे करंटे तेच...असे सांगत पुलकसागरजी म्हणाले, आई वडीलांना काहीही नको असते, जे काही असते ते आपल्या मुलांसाठीच करत असतात, त्यांना गरज असते ती दोन शब्द त्यांच्याशी तुम्ही आपुलकीने संवाद साधण्याची. मुलगा जेव्हा परदेशात जातो तेव्हा घरातील प्रत्येकाला त्याने आपल्यासाठी काहीतरी आणावे अशी अपेक्षा असते, एकटी आईच अशी असते की ती त्या मुलाला सांगते की तू लवकर आणि सुखरुप परत ये, मला बाकी काही नको.... ज्या घरातील आई वडीलांच्या डोळ्यात अश्रू येतात त्या घरात कोणीही कितीही पुण्य केलेले असेल तर तेही या अश्रूंसोबतच संपून जाते, त्या मुळे आपल्या कृतीने आई वडीलांच्या डोळ्यात पाणी येऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन महाराजांनी केले. 

जे आई वडील स्वताःच्या सुखाचा त्याग करत मुलांच्या सुखासाठी कष्ट करतात त्या आई वडीलांना तुम्ही आनंद नाही देऊ शकला तरी चालेल पण किमान त्यांना दुःख तरी देऊ नका, आज तुम्ही जीवनात जे काही आहात ते केवळ तुमच्या आई वडीलांमुळेच आहात याचा विसर पडू देऊ नका असे ते म्हणाले. 

...विसरू नका तुम्हीही म्हातारे होणार आहात
आज ज्या आई वडीलांमुळे तुम्ही मोठे झाला त्यांच्याकडेच पाहायला तुम्हाला वेळ नाही, उद्या तुम्हीही म्हातारे होणार आहात, तुमची मुलेही तुमच्याशी असाच व्यवहार करतील, याचा विसर पडू देऊ का, आज जी वागणूक तुम्ही आई वडीलांना देता आहात तिच वागणूक उद्या तुम्हालाही मिळणार आहे.