रामदास आठवले म्हणतात पवारसाहेबांनी एनडीएत यावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

बारामती - 'राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. त्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) यावे. आम्ही त्यांनी राष्ट्रपतिपदावर निवडून आणू, असा विश्‍वास केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

बारामती - 'राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. त्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) यावे. आम्ही त्यांनी राष्ट्रपतिपदावर निवडून आणू, असा विश्‍वास केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

पवारसाहेब हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या स्पर्धेत नसल्याचेही सांगितलेले आहे. विरोधात राहून ते राष्ट्रपती होणार नाहीत. त्यासाठी त्यांना मी हे निमंत्रण देत आहे. मात्र ते विरोधात उभे राहिले तर आमचा त्यांना पाठिंबा राहणार नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

बारामतीत एका विवाहास उपस्थित राहण्यासाठी आलेल्या आठवले यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार उमेदवार असतील तर महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून तुमची भूमिका काय असेल, या प्रश्नाला उत्तर देताना वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले," माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देशातील अभ्यासू नेते आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची क्षमता आहे. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे, आम्ही त्यांना निवडून आणू. ते मुळात राष्ट्रपतिपदाचे उमेदवार नाहीत, असे त्यांनीच स्पष्ट केले आहे, मात्र ते विरोधी पक्षांकडून सहमतीचे उमेदवार म्हणून उभे राहीले, तरी निवडून येणार नाहीत आणि ते एनडीए विरोधात उमेदवार असतील तर आमचा त्यांना पाठींबा असणार नाही.""

नक्षलवाद्यांच्या एका प्रश्नावर आठवले म्हणाले, 'नक्षलवाद्यांच्या त्यागाचे मला कौतुक वाटते. त्यांच्या भागाचा विकास झाला पाहिजे यासह त्यांच्या मागण्या रास्तही आहेत. मात्र त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे. समाजाच्या जडणघडणीत त्यांनी यावे. वाटल्यास त्यांनी राजकारणात यावे. रिपब्लीकन पक्षात प्रवेश करावा किंवा इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करावा, मात्र त्यांनी आताचा हिंसेचा मार्ग सोडून दिला पाहिजे, तो मार्ग योग्य नाही."

शिवसेनेने पाठींबा काढला तरी राज्यातील फडणवीस सरकार पडणार नाही, आमच्याकडे अपक्षांचा पाठींबा आहे, आमदारांना मुदतपूर्व निवडणूका नको आहेत, हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असेही आठवले म्हणाले.