‘राष्ट्रवादी’ वाढविणार सोशल मीडियाचा वापर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

बारामती - ‘काळ बदलतो आहे. त्यानुसार पक्षाला बदलणं ही गरज आहे. त्यामुळे या पुढील काळात बूथ कमिटी व सोशल मीडियाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक महत्त्व देईल,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘पक्षाने कात टाकायला सुरवात केली असून, येत्या काही काळात ‘राष्ट्रवादी’त नव्याने बदल दिसतील. या पुढील काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने संघटनाबांधणी करण्याचा महत्त्वाचा प्रयोग ‘राष्ट्रवादी’त होणार आहे. सर्व प्रकारच्या सोशल मीडियाची मदत घेत युवा पिढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न होणार आहे. युवा पिढीला आज मोबाईलमधून डोके वर काढायला सवड होत नाही. त्यामुळे आता इतर माध्यमांपेक्षा नवीन पिढीपर्यंत पोचण्याचे सोशल मीडिया हे माध्यम असून, त्याचा वापर वाढवा. तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट काम करायला तुम्ही शिका. कार्यकर्त्यांना या वापराचे प्रशिक्षण दिले जाईल. या पुढील काळात सभेला नवीन पिढी येणार नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आता सोशल मीडियाची मदत घ्यायला हवी,’’ असा सल्ला सुळे यांनी दिला.