पीएमपीच्या स्थानकांमध्ये पायभूत सुविधा

पीएमपीच्या स्थानकांमध्ये पायभूत सुविधा

दिल्लीतील बैठकीत तत्त्वतः मंजुरी; मेट्रोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना

पुणे - शहरातील नियोजित मेट्रो प्रकल्पासाठी प्रवासी संख्या वाढावी, यासाठी पीएमपीच्या पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील दहा स्थानकांमध्ये प्रवासीकेंद्रित पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी १२३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला दिल्लीत झालेल्या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. या बाबतचे तपशीलवार सादरीकरण झाल्यावर त्याला अंतिम मंजुरी मिळणार आहे. 

महामेट्रोच्या संचालक मंडळाची बैठक दिल्लीत झाली. राज्याचे नगरविकास खात्यामधील प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित आदी उपस्थित होते. मेट्रोच्या वनाज-रामवाडी मार्गात बदल झाला आहे. त्यामुळे हा मार्ग आता नदीपात्राजवळून जाणार आहे. त्याचे तसेच पिंपरी- स्वारगेट, हिंजवडी- शिवाजीनगर मार्गाचे स्थानक शिवाजीनगरमधील धान्य गोदामाच्या जागेवर होणार आहे. त्यामुळे आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) या स्थानकाची गरज आता राहणार नाही. मेट्रोच्या आराखड्यातून ते वगळले जाऊ शकते. यामुळे या प्रकल्पात सुमारे २३० कोटी रुपयांची बचत होऊ शकते. 

या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी १० स्थानकांच्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव सादर केला. या स्थानकांमध्ये प्रवासीकेंद्रित पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास पर्यायाने मेट्रोची प्रवासी संख्या वाढेल. त्यासाठी एक-दोन वर्षांत या सुविधा निर्माण करत असून, त्यासाठी सुमारे १२३ कोटी रुपये खर्च येणार आहे. ‘एएसआय’ स्थानक कमी झाल्यामुळे होणाऱ्या आर्थिक बचतीमधून हा खर्च करता येईल. पर्यायाने राज्य, केंद्र सरकार आणि दोन्ही महापालिकांना कोणताही खर्च न येता, या स्थानकांत सुविधा निर्माण करता येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आणि पुढील बैठकीत आराखडा सादर करण्यास सांगितले. त्यासाठी कुणाल कुमार, दीक्षित आणि तज्ज्ञ यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. 

एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन 
शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकच लोगो (चिन्ह) असावा, या मुद्यावरही बैठकीत एकमत झाले. त्यासाठी महामेट्रो निविदा काढून प्रक्रिया सुरू करणार आहे. दोन्ही महापालिकांनी बीआरटी सुरू केली असून, आगामी काळात तिचे विस्तारीकरणही होणार आहे. तसेच पुणे महापालिकेने सायकल आराखड्याची अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. मेट्रोचेही काम सुरू झाले असून, आगामी काळात हे तिन्ही प्रकल्प परस्परांना पूरक ठरतील, या दृष्टीने त्यांची एकात्मिक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय या वेळी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com