मारहाणीच्या घटनेची उपायुक्‍तांमार्फत चौकशी करणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

'सकाळ'च्या वृत्ताची पोलिस आयुक्‍तांकडून दखल; आठ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

'सकाळ'च्या वृत्ताची पोलिस आयुक्‍तांकडून दखल; आठ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश
पुणे - समर्थ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तरुणास बेदम मारहाण केलेल्या घटनेची पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणाची पोलिस उपायुक्‍तांमार्फत चौकशी करण्यात येणार असून, आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शुक्‍ला यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

रास्ता पेठेत दुचाकी गाड्या रस्त्याच्या कडेला लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या कारणावरून मायकेल साठे आणि विक्रेता यांच्यात वाद झाला. त्या वेळी साठे यांनी त्यांना मारहाण होत असल्याचे पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून कळविले. काही वेळानंतर समर्थ पोलिस ठाण्यातील बीट मार्शल तेथे आले. पोलिसांनी ते भांडण सोडविले. मात्र, पुन्हा तेथील काही महिला साठे यांच्या पत्नीच्या अंगावर धावून गेल्या. पोलिस असूनही जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या साठे यांनी बीट मार्शलची गाडी घेतली. पत्नीला सोबत घेऊन जवळच असलेल्या समर्थ पोलिस ठाण्यात गाडी नेली. मात्र, त्या बीट मार्शलनी साठे यांना गाडी नेल्याच्या कारणावरून बंदखोलीत काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.

या संदर्भात "मदत मागणाऱ्यालाच खाकी वर्दीकडून बेदम मारहाण' असे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले. या वृत्ताची पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी पोलिस सहआयुक्‍त रवींद्र कदम यांची भेट घेतली. या वेळी कदम यांनी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस उपायुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांना दिले आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- रवींद्र कदम, पोलिस सहआयुक्‍त

घडलेला प्रकार अत्यंत भयानक आहे. पत्नी आणि स्वतःच्या जिवाला धोका असल्यामुळे मायकेल साठे पोलिसांची दुचाकी घेऊन ठाण्यात गेले. त्यामागे चोरी करणे हा उद्देश नव्हता. मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे; अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
- वंदना चव्हाण, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस