‘त्यांच्या’मुळे नाटकांच्या जाहिराती सुंदर!

‘त्यांच्या’मुळे नाटकांच्या जाहिराती सुंदर!

नाट्यगृहांमध्ये पंचवीस वर्षांपासून बाळकृष्ण कलाल यांची कलाकारी

पुणे - अत्यंत वळणदार, सुबक अक्षरातील नाटकांच्या जाहिरातींचे फलक पाहून ‘किती सुंदर अक्षर आहे!’ असे कौतुकाचे बोल आपूसकच निघतात. नाटकांचे जाहिरात फलक वळणदार अक्षरात तयार करण्याची किमया गेल्या २५ वर्षांपासून पेंटर बाळकृष्ण कलाल करत आहेत. अगदी ‘घाशीराम कोतवाल’ ते आजच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’पर्यंतच्या नाटकांच्या नावांचे फलक त्यांनी तयार केले असून, शहरातील प्रमुख नाट्यगृहांतील फलक तयार करण्याचे काम तेच करत आहेत. 

सोशल मीडिया, ग्राफिटी आणि डिजिटलच्या जमान्यात सुबक व सुंदर अक्षरांच्या दुनियेपासून युवा पिढी काहीशी दूरच आहे; पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बाळकृष्ण यांनी आपल्या याच वेगळेपणामुळे हा पारंपरिक व्यवसाय जिवंत ठेवला आहे. त्यांचे जाहिरात फलक पाहून कित्येक नाटकांना हाउसफुलचा बोर्ड लागला आहे. ‘ती फुलराणी’पासून ते ‘सही रे सही’ अन्‌ ‘सखाराम बाईंडर’ ते ‘अमर फोटो स्टुडिओ’ अशा नाटकांचा आणि त्यांच्या जाहिरातींचा प्रवास त्यांनी अनुभवला आहे. सध्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिरात ते नाटकांच्या जाहिरातींचे फलक तयार करतात. बाळकृष्ण हे थेट पत्र्याच्या फलकावर अक्षर रेखाटायला सुरवात करतात. त्यासाठी ते पूर्वतयारी करत नाहीत. इतक्‍या वर्षांत फलक तयार करण्याची किमया त्यांच्यात रुजल्यामुळे त्यांना आता काहीच अडचणी येत नाहीत.  

 बाळकृष्ण हे दहावी शिकलेले. त्यांना जाहिरात फलक तयार करण्याचे शिक्षण आणि वारसा त्यांच्या मोठ्या बंधूंकडून मिळाला. त्यांच्या या कलेबाबत बाळकृष्ण म्हणाले, ‘‘माझे अक्षर चांगले असल्याने मला जाहिरात फलक तयार करण्याचे काम मिळाले. मी शनिवारी व रविवारी हे काम करतो. २५ वर्षांत अनेक नाटकांचे फलक तयार केले आहेत. आज प्रसिद्धीची माध्यमे बदलली आहेत. डिजिटल माध्यमाद्वारे जाहिराती तयार केल्या जातात. या जमान्यात जाहिरात फलकांचा आजही पारंपरिक प्रसिद्धीचा अवलंब होत असल्याचा आनंद आहे.’’

मी गेल्या २५ वर्षांपासून रंगभूमीचा एक देदीप्यमान काळ अनुभवला आहे. नाटकांचा बदलत गेलेला प्रवाह अनुभवण्यासह प्रसिद्धीसाठीची डिजिटल माध्यमेही मी पाहिली आहेत; पण अजूनही या जाहिरात फलकांमुळे नाटकांच्या संयोजकांना जे समाधान मिळते ते खूपच वेगळे आहे. अनेक नामवंत नाट्यकर्मींना जवळून पाहिले आणि त्यांच्याशी ओळख झाली. त्यांचे कामही जवळून पाहता आले. 
- बाळकृष्ण कलाल, पेंटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com