संस्कृती, देशाची ओळख भाषेमुळे - श्री श्री रविशंकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पुणे - ‘‘भारतीय भाषा आणि संस्कृती या अध्यात्माशी जोडलेल्या आहेत. भाषा जिवंत राहिली तर संस्कृती जिवंत राहते आणि त्यामुळेच देशाची ओळख निर्माण होते; पण सध्या हिंदी, मराठीसारख्या भाषेतून संस्कृत शब्द बाहेर फेकले जात आहेत. लहान मुलांमध्ये या भाषांविषयी गर्व निर्माण केल्यास भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करता येईल,’’ असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी येथे केले. 

विश्‍व हिंदी साहित्य परिषदेच्या वतीने विश्‍व वागेश्‍वरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. शहराच्या महापौर मुक्ता टिळक, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, दीनदयाळ स्मृती संस्थेचे विनोद शुक्‍ल, विश्‍व हिंदी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आशिष कंदवे, कुलाधिपती एच. सी. गनेशिया, उपाध्यक्षा चित्रा गोयल, रजनी सेठ, महासचिव ममता गोयंका, संयोजक सुधीर कलंत्री, शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

रविशंकर म्हणाले, ‘‘चीन, जापान, फ्रान्स, जर्मनी या देशांनी आपल्या भाषांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी सर्वच पुस्तके त्या त्या भाषेत रूपांतरित केली आहेत. यामुळे त्यांच्या भाषेचा प्रभाव आणि तिचे महत्त्व टिकून आहे. आपल्या मराठी, तमीळ, मल्याळम, तेलुगू यांसारख्या भाषांमध्ये संस्कृतचा प्रभाव जाणवतो. उत्तर आणि दक्षिणेतल्या लोकांना जोडणारा हा धागा आहे. त्यामुळे अशा भाषांना जिवंत ठेवणे आवश्‍यक आहे.’’

प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘‘आपल्या सभोवती असलेल्या समाजाचा साहित्यावर सखोल परिणाम होतो. त्यामुळे साहित्याला समाजाचा आरसा म्हणणे योग्य आहे. समृद्ध साहित्याची निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी असे कार्यक्रम आवश्‍यक आहेत.’’

यावेळी डॉ. के. एच. संचेती, डॉ. विन्देश्‍वर पाठक, ज्ञानसुधा मिश्रा, अरुणा ढेरे, जयश्री पेरीवाल, डॉ. हरीश नवल, संजय भारद्वाज, मुकेश भारद्वाज, तेजेंद्र शर्मा, हुकूमसिंह मेणा, ओमप्रकाश गौतम, सुशील वर्मा, सचिन गुप्ता आदींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंदवे यांनी, तर आभार प्रदर्शन चित्रा गोयल यांनी केले.

Web Title: Because of the identity of the country, culture and language