‘उजनी’मधील मगरीचे भय संपत नाही...

‘उजनी’मधील मगरीचे भय संपत नाही...

भवानीनगर - उजनी धरणात मगर आहे अशा अफवा आणि चर्चा झडल्या; मात्र खरोखरच मगर सापडली. त्यानंतरही भय इथले संपत नाही, अशी अवस्था झाली आहे. उजनीत अनेक मगरी असाव्यात, अशी मच्छीमारांमध्ये भीती आहे. कारण कंदर येथे मगर जाळ्यात सापडल्यानंतरही दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्‍यात अगदी तक्रारवाडी, राजेगाव परिसरातही मच्छीमारांना मगर दिसल्याने मच्छीमार भयभीत आहेत.

उजनी जलाशयात मगर आहे, अशी काही दिवसांपूर्वी मच्छीमारांनी माहिती दिल्यानंतर ही अफवा असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर उजनी येथील भीमानगर मत्स्य केंद्राच्या मत्स्यबीज तळ्यांमध्ये मगरीचा वावर आढळून आला. मगर या तळ्यातील माशांच्या पिलांना खाऊन मासे तोडून टाकत असल्याचे येथील अधिकारी राजेंद्र राठोड यांनी निदर्शनास आणून दिले व वन खात्याकडे पत्राद्वारे मगरीला पकडण्यासाठी पाठपुरावाही केला.

जबाबदार अधिकाऱ्यांनी छातीठोकपणे सांगूनही मगरीच्या अफवेची चर्चा सुरूच होती. अखेर १६ सप्टेंबर रोजी कंदर (करमाळा) नजीक मगरीला पकडण्यात यश आले आणि उजनीत चक्क मगर आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. तक्रारवाडी येथे सुनील मल्लाव, अशोक मल्लाव यांनी तर खेड पुलानजीक प्रदीप सोलनपुरे, राजेगावनजीकही काही मच्छीमारांनी मगर पाहिल्याचे अंबिका मत्स्य व्यवसाय संस्थेचे संदीप मल्लाव यांनी सांगितले. 

मगर सापडल्यानंतर मच्छीमारही निश्‍चिंत झाले होते; मात्र दोन दिवसांपूर्वी इंदापूरनजीक हिंगणगाव व त्यापाठोपाठ राजेगाव, तक्रारवाडी येथेही स्थानिक मच्छीमारांना मगर दिसल्याने मगरीची भीती कायम आहे.

त्याचबरोबर घाबरलेल्या मच्छीमारांनी काही ठिकाणी एक, तर काही ठिकाणी दोन मगरींना पाहिल्याची माहिती दिल्याने ही भीती आणखीच वाढली आहे.

इंदापूर तालुक्‍यातील हिंगणगाव आणि भिगवणनजीकचे तक्रारवाडी यातील अंतर जवळपास पस्तीस किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने एकाच दिवसात काही वेळात दिसलेल्या या मगरीमुळे या दोन ठिकाणी पाहिलेली मगर वेगवेगळी असल्याबद्दलचे तर्क लढविले जात आहेत. उजनीत अजूनही मगरींचा वावर आढळून आल्याने थर्माकोलवरती तसेच ट्यूबवरती मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये सर्वाधिक दहशत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com