भीमा-पाटस कारखान्याचा ऊस उत्पादकांना दिलासा

Sugarcane
Sugarcane

दौंड - पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकवलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी उत्पादित साखरेचा लिलाव करून विक्रीप्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यातून जमा झालेले तीस कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित २४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपये मिळताच संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल गेल्या १७ वर्षांपासून कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याने ३१ मार्च २०१८ अखेर एकूण ३ लाख ९२ हजार २९० टन इतक्‍या उसाचे गाळप केले होते; परंतु एफआरपीची रक्कम थकविली होती. प्रतिटन २५५० रुपये या दराने एफआरपी थकीत होती. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत संस्थापक असलेल्या रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सर्फराज शेख यांनी थकीत एफआरपीसाठी संबंधित मंत्रालयाकडे दाद मागून पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्याचे साखर आयुक्त यांनी २६ एप्रिल रोजी एफआरपी न दिल्याने  कारखान्याने तयार केलेली साखर आणि आवश्‍यकतेप्रमाणे कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता विक्री करून ही रक्कम ऊस उत्पादकांना व्याजासह देण्याचा आदेश दिला होता. या विक्री व्यवहारासाठी दौंडचे तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आल्याने त्यांनी कारखान्याच्या साखरेची लिलावाद्वारे विक्री केली.

साखरेची विक्रीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. लेखा परीक्षकांकडून आलेल्या यादीप्रमाणे विक्रीपोटी जमा झालेले तीस कोटी रुपये संबंधितांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. लिलाव घेणाऱ्यांकडून उर्वरित रक्कम प्राप्त होताच ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.
- बालाजी सोमवंशी, तहसीलदार, दौंड 

माझ्या मुलाच्या नावाने ११३ टन ऊस ‘भीमा-पाटस’ला गाळपाला दिला होता. त्या उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम त्याच्या बॅंक खात्यात नुकतीच जमा झाली आहे. पण, ही रक्कम उशिरा जमा झाल्याने आमचा आर्थिक ताळेबंद विस्कळित झाला आहे. कारखान्याने या रकमेवरील व्याजही दिले पाहिजे. 
- चंद्रकांत चव्हाण, शेतकरी, मलठण, ता. दौंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com