सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

Bhor-Municipal-Election
Bhor-Municipal-Election

भोर - भोर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून अंतिम टप्प्यात वैयक्तिक भेटीगाठींवर उमेदवारांचा भर आहे. काँग्रेसपुढे सत्ता राखण्याचे आव्हान असून सत्ता खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व्यूहरचना करीत आहे. नव्या दमाने निवडणुकीत उतरलेले भाजप व शिवसेना नगरपालिकेत खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी वाहनांवर ध्वनिवर्धक लावत मराठी गाण्यांच्या चालीवर प्रचार केला. या शिवाय प्रचाराच्या गाड्यांमधील एलईडी स्क्रीनवरून ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातूनही मतदारांशी संवाद साधला. आमदार संग्राम थोपटे आणि त्यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली. राष्ट्रवादीकडून पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते यशवंत डाळ, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, भालचंद्र जगताप यांनी प्रचारात सहभाग घेतला. केदार देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख माउली शिंदे, कुलदीप कोंडे, अमोल पांगारे प्रचारात उतरले आहेत. भाजपकडून तालुकाध्यक्ष गणेश निगडे, शहराध्यक्ष सचिन मांडके, सतीश शेटे, प्रदीप खोपडे, अमर बुदगुडे यांच्यासह संघाचे स्थानिक पदाधिकारी प्रचारात सहभागी आहेत. 
         
नगराध्यक्षपदासाठी चुरस
नगराध्यक्षपदासाठी सर्वांत जास्त चुरस असून अनपेक्षित निकालाची शक्‍यताही नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसच्या निर्मला आवारे, राष्ट्रवादीच्या शारदा डाळ, भाजपच्या दीपाली शेटे आणि शिवसेनेच्या स्वप्ना देशपांडे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत होत आहे. 
प्रभाग क्रमांक एक ते सात यात प्रत्येकी २, प्रभाग क्रमांक आठमधून ३ जण निवडून दिले जाणार आहेत. सर्वाधिक मतदार असलेल्या प्रभाग क्रमांक आठमध्ये चारही राजकीय पक्षांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. काँग्रेसच्या आवारे वगळता राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे पती हे प्रभाग क्रमांक आठमधून नगरसेवकाची निवडणूक लढवीत आहेत. यात राष्ट्रवादीचे यशवंत डाळ, भाजपचे सतीश शेटे, शिवसेनेचे केदार देशपांडे यांच्यासह काँग्रेसचा नवीन चेहरा सुमंत शेटे यांच्यात लढत होत आहे. या गटातून ज्या पक्षाचा उमेदवार मताधिक्‍य घेईल, त्या पक्षाचा नगराध्यक्ष होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

नाराजांचा काँग्रेसला फटका?   
आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात गेल्या पाच वर्षांत झालेल्या कोट्यवधींच्या विकासकामांमुळे आमच्या सर्व उमेदवारांचा विजय नक्की आहे, असा दावा काँग्रेसकडून होत आहे. रामचंद्र आवारे यांनी यापूर्वी उपनगराध्यक्षपद भूषविले आहे, त्यामुळे निर्मला आवारे यांचा विजय काँग्रेसकडून निश्‍चित मानला जात आहे. पण, काँग्रेसकडून काही ठिकाणी नगरसेवकाच्या खुल्या जागेवर इतर मागास प्रवर्गातील उमेदवार दिला आहे. त्यामुळे, तसेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटकाही बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोपी वाटणारी निवडणूक काँग्रेसला स्पर्धेची झाली आहे. 

राष्ट्रवादीलाही विजयाची खात्री 
राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत डाळ यांनी शहरातील वाघजाई मंदिर व इतर मंदिरासाठी केलेल्या मदतीमुळे आणि इतर सामाजिक कार्यामुळे त्यांना विजयाची खात्री आहे. भाजपच्या शेटे यांनी या पूर्वी नगराध्यक्षपद भूषविले असल्याने त्यांना पालिकेतील कामाची माहिती आहे. या शिवाय राज्यातील सत्ताधारी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत असल्याने त्यांनाही विजयाची खात्री आहे. शिवसेनेच्या स्वप्ना देशपांडे जरी नवीन असल्या तरी त्यांचे पती केदार देशपांडे हे माजी नगरसेवक आहेत. या शिवाय त्यांनी प्रचारात जोर लावला आहे, त्यामुळे त्यांनाही विजयाची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com