कार्यकर्त्यांकडूनच पुणे भाजप कार्यालयाची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

'स्वीकृत'वरून नाराजी

सदस्यांच्या निवडीवरून नाराज झालेले गणेश घोष समर्थक आक्रमक झाले. त्यांनी कार्यालयातील वस्तू उचलून फेकत मोडतोड करायला सुरवात केली. 

पुणे : स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून झालेल्या वादाचे रुपांतर संघर्षात झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनीच पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली. आज (मंगळवार) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास भाजपचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या दालनात बैठक सुरू होती. त्यावेळी ही प्रकार घडला. 

या बैठकीदरम्यान स्वीकृत सदस्यांची तीन नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर स्वीकृत सदस्यपदासाठीचे इच्छुक उमेदवार गणेश घोष, भिमाले आणि रघू गौडा यांच्यात बाचाबाची सुरू झाली. सदस्यांच्या निवडीवरून नाराज झालेले घोष समर्थक आक्रमक झाले. त्यांनी कार्यालयातील वस्तू उचलून फेकत मोडतोड करायला सुरवात केली. 

यामध्ये कार्यकर्त्यांनी सभागृह नेते भिमाले यांचे दालन फोडले. कार्यालयातील कुंड्या, खुर्च्या उचलून फेकत काचा व फर्निचरची मोडतोड केली. कार्यकर्त्यांची धुमश्चक्री सुरू झाल्यानंतर महापालिकेतील उपस्थित नगरसेवक, कर्मचारी यांची पळापळ सुरू झाली. त्यानंतर महापालिकेचे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आले. तसेच, पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा महापालिकेत तातडीने दाखल झाला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अद्याप कोणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती. पोलिस पुढील तपास करीत आहेत. 
 

फोटो गॅलरी