‘डरकाळ्या’ नकोत; ठोस भूमिका हवी!

Batmichya-Palikade
Batmichya-Palikade

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यापासून सेनेची भाजपविरोधातील धार काहीशी कमी झालेली दिसते. लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने भाजपसोबत युतीबाबतची आपली टोकाची भूमिका बाजूला ठेवून युती हा एकट्याचा निर्णय नसतो, असे सांगत आगामी निवडणुकीत युतीची शक्‍यता पल्लवीत ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधातील शुक्रवारी झालेल्या अविश्‍वास ठरावावरील भूमिका शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर न करता तटस्थ राहून भाजपला मदतच केली. त्यामुळे सध्या कितीही ‘डरकाळ्या’ फोडल्या, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढेल याबाबत साशंकताच आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्राच्या पुण्यात झालेल्या बैठकीवरून ठाकरे यांना शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज आलाच असेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतील पक्षबांधणीबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत स्वतंत्र लढण्याच्या तयारीपेक्षाही पक्षांतर्गत मतभेद मिटविण्यावरच ठाकरे यांना भर द्यावा लागला. देवेंद्र फडणीस सरकारच्या स्थापनेपासून शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. 

सत्तेत राहून त्यांचा हा कडवा विरोध भाजपला सहन करावा लागत असल्याने आगामी निवडणुकीत युती होणार की नाही, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवसेनेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्र लढणार, अशी घोषणा झाली. शिवसैनिकांनी या योजनेचे जोरदार स्वागतही केले; पण पक्षाच्या विद्यमान आमदार-खासदारांनी मात्र त्याबाबत नाराजी व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या वतीने स्वतंत्र लढण्याबाबत गेली काही दिवसांपासून चाचपणी करीत आहे; पण त्यात फारसे काही ठोस हाती लागत नसल्याने कदाचित पक्षाने युतीबाबतची आपली भूमिका नरम केलेली दिसते. 

पुण्याचा विचार केला, तर पक्षाची कधी नव्हे एवढी परिस्थिती खालावलेली आहे. विधानसभेत पक्षाला एकही जागा मिळाली नाही, महापालिकेत पक्षाचे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर घटले. त्यामुळे लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय झालाच, तर तगड्या उमेदवारापासून शोधाशोध करावी लागणार आहे. पक्षाने दोन शहराध्यक्ष नियुक्त केले आहेत, त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. पक्षातील पदाधिकारी इतर पक्षात जाणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी लागेल.

पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ या लोकसभेच्या दोन जागा सध्या शिवसेनेकडे आहेत. शिरूरमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे स्वतःचे काम आहे. पक्षबांधणीपेक्षा त्यांचे स्वतःचे कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे. तरीही भाजपची जर त्यांना साथ मिळाली नाही, तर विजयासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल. मावळची परिस्थिती अशीच आहे.

पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात भाजपने आपले स्थान बळकट केले आहे. मावळमधील पुणे जिल्ह्याबाहेरील विधानसभा मतदारसंघात आघाडी-युतीचे गणित कसे राहील यावर शिवसेनेचे यशापयश अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघात लोकसभेसाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दोन जागा स्वबळावर टिकवण्यासाठी शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

कार्यकर्त्यांची बांधणी अधिक मजबूत करावी लागणार आहे. भाजपविरोधात नुसता आवाज काढून चालणार नाही, वेळीच आपली भूमिकाही स्पष्ट करावी लागेल, तरच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com