वर्धापन दिन खर्चावरून भाजपमध्ये वाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - दिल्लीपासून महापालिकेपर्यंतची सत्ता ताब्यात असूनही भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचा खर्च कोणी करायचा, यावरून लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू झाला आहे. मुंबईतील मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी होणाऱ्या खर्चापासून लांब राहण्याची आमदारांची खेळी नगरसेवकांनी हाणून पाडली. मात्र, महापालिकेच्या कारभारात लक्ष घालत नसल्याने हा खर्च नगरसेवकांनी करावा, अशी अपेक्षा आमदारांची आहे. तर, "आमदारांचा खर्च आम्ही का करायचा,' असा प्रश्‍न नगरसेवकांनी नेत्यांकडे विचारला. परिणामी, पक्षनेतृत्वाने प्रतिष्ठेच्या केलेल्या मेळाव्याआधीच आमदार- नगरसेवकांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. 

भाजपला गेल्या काही निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाल्याने पक्षाचा वर्धापन दिन यंदा धडाक्‍यात साजरा करण्याचे नियोजन नेतृत्वाने केले आहे, त्यासाठी पुण्यातून मोठी गर्दी करण्याचा नेत्यांचा प्रयत्न असून, त्यासाठी गेल्या काही दिवसांत नगरसेवकांच्या तीन बैठका घेण्यात आल्या. त्यातील शनिवारच्या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते, तेव्हा मेळाव्याला मोठी गर्दी करावीच लागणार असल्याचे नेत्यांनी बैठकीत सांगितले. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी पाच बसगाड्यांची व्यवस्था करावी, अशी सूचनावजा आदेश दिला. त्यावरून खर्चाचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा, "महापालिकेच्या कारभाराकडे लक्ष देत नाही, त्यामुळे मुंबईला लोकांना नेण्याचा सर्व खर्च नगरसेवकांनी केला पाहिजे,' असा आग्रह आमदारांनी धरल्याचे नगरसेवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यावरून नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. "पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे गर्दी करू, त्यासाठीचा खर्चही करू; पण आमदारांचा खर्च आम्ही करणार नाही,' असे नगरसेवकांनी जाहीर केले. त्यातूनच आमदार- नगरसेवकांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. या वादात नेत्यांनी हस्तक्षेप करीत, नवे मुद्दे चर्चेत आणले. त्यामुळे खर्चाच्या मुद्द्यावरील चर्चा थांबली. आमदारांनी बैठकीत घेतलेल्या भूमिकेची चर्चा नगरसेवकांमध्ये रंगली आहे.

Web Title: BJP on anniversary expenditure pune