शक्तिप्रदर्शनाने भाजपचा 38 वा वर्धापन दिन साजरा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पुणे - शक्तिप्रदर्शन करीत आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत भारतीय जनता पक्षाचा 38 वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा झाला. अन्य राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांनीही या प्रसंगी उपस्थिती लावली. 

पुणे - शक्तिप्रदर्शन करीत आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत भारतीय जनता पक्षाचा 38 वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा झाला. अन्य राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांनीही या प्रसंगी उपस्थिती लावली. 

लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ महापालिका निवडणुकीतही भाजपला शहरात मोठे यश मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात पहिल्यांदाच भव्य प्रमाणात भाजपने न्यू इंग्लिश स्कूलच्या शनिवार पेठेतील मैदानावर वर्धापन दिन साजरा केला. या प्रसंगी जनसंघ ते भाजप, असा प्रवास छायाचित्रांद्वारे प्रदर्शनात मांडण्यात आला. पक्षाच्या वाटचालीतील विविध टप्पे त्यात सादर करण्यात आले होते. वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीत झाला. त्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण मैदानातील एलईडी स्क्रीनवरून करण्यात येत होते. पक्षाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या प्रसंगी हजेरी लावली. तसेच नव्या पक्षात दाखल होऊन नगरसेवक झालेलेही या प्रसंगी दिसत होते. कार्यकर्त्या महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षाने शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा या वेळी होत होती. या प्रसंगी प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेला कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता. दिल्लीत संसदेचे आणि मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे खासदार, आमदार अनुपस्थित होते.