भाजप राज्य चालविण्याच्या परीक्षेत पूर्णपणे नापास - मनसे

manse
manse

राजगुरूनगर - ''लाखो, करोडो रुपयांचा निधी आणू अशा फसव्या आणि पोकळ घोषणा देत फिरणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे भाजप सरकार राज्य चालविण्याच्या परीक्षेत पूर्णपणे नापास झाले आहे'', अशी टीका मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी येथे केली. मॅग्नेटिक महाराष्ट्र, कॅशलेस व्यवस्था, डिजिटल इंडिया, अच्छे दिन, शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी इत्यादी फक्त स्वप्न दाखविणाऱ्या घोषणा ते करीत असून, त्या प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे नाही, असेही ते म्हणाले. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घोषणेनुसार, त्यांच्या पक्षाचे बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि रिटा गुप्ता हे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आले असून, ते विधानसभा मतदारसंघानुसार बैठका घेत आहेत. खेडची बैठक अविनाश अभ्यंकर यांनी घेतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हाप्रमुख समीर थिगळे, मनोज खराबी, संदीप पवार, श्रीकांत जाधव, अभय वाडेकर, नितीन ताठे आदी उपस्थित होते. 

मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात १६ लाख कोटींची गुंतवणूक येईल असे ते सांगत आहेत, प्रत्यक्षात ते अशक्य आहे. या मुख्यमंत्र्यांच्या काळात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे आणि ते मात्र ३६ लाख रोजगार उपलब्ध होतील असे सांगत फिरत आहेत. पुढच्या घोषणा देताना मागच्या घोषणांचे काय झाले हे त्यांनी सांगावे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी देणारा होते त्याचे काय झाले? नाशिक दत्तक घेऊनही पोरके का झाले? तेथे तुकाराम मुंडेंना का आणावे लागले? राज्यात १३०० शाळा का बंद कराव्या लागल्या? सिंचनाची कामे का थांबविली? शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकरी मोर्चे का काढताहेत? आत्महत्या का करताहेत? त्यांच्या मालाला दीडपट भाव जाऊद्या उत्पादनाखर्च तरी निघतो का? नक्की कर्जमाफी किती झाली? किती गावे कॅशलेस झाली? या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत असे अभ्यंकर म्हणाले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन सोडविण्यासाठी कार्यरत झाली आहे. सरकारदरबारी त्यांचे प्रश्न पूर्ण ताकदीने, अभ्यासूपणे आणि आक्रमकपणे मांडून न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही अभ्यंकर यांनी दिली. शेतकऱ्यांनी २७०० कोटींची वीजबिलाची थकबाकी भरावी, नंतर दंड माफ करू असे  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. शेतकरी अन्न पिकवितो, ते सामान्य माणसापासून मुख्यमंत्रीही खातात, त्या अन्नाला तरी जागा, असे ते म्हणाले. ज्यांनी देश कॅशलेस केला त्या नीरव मोदी, विजय मल्ल्या अशांना फरफटत घेऊन या आणि पैसे वसूल करून शेतकऱ्यांना द्या, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com