मतदारांच्या कौलामुळे भाजपची खेळी यशस्वी 

योगीराज प्रभुणे 
बुधवार, 8 मार्च 2017

पुणे - खडकवासला विधानसभा मतदार संघातील भाजपचा किल्ला राखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून उमेदवार आयात करण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरल्याचे चित्र वडगाव धायरी -वडगाव बुद्रुक प्रभागात दिसते. नवीन मतदारांची प्रभागात वाढलेली संख्या आणि पक्षाला पाहून मतदारांनी केलेले मतदान यामुळे भाजपच्या या खेळीला मतदारांचा कौल मिळालेला दिसतो. 

पुणे - खडकवासला विधानसभा मतदार संघातील भाजपचा किल्ला राखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून उमेदवार आयात करण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरल्याचे चित्र वडगाव धायरी -वडगाव बुद्रुक प्रभागात दिसते. नवीन मतदारांची प्रभागात वाढलेली संख्या आणि पक्षाला पाहून मतदारांनी केलेले मतदान यामुळे भाजपच्या या खेळीला मतदारांचा कौल मिळालेला दिसतो. 

बारामती लोकसभा मतदारसंघात या प्रभागाचा समावेश होतो. त्यामुळे येथून झालेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पराभव हा पक्षाला मोठा धक्का आहे. या परिसरात राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग असतानाही राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडणुकीत विजयी झाला नाही. भाजपचे सर्व पॅनेल यात निवडून आले. त्यामागे या प्रभागातील बदललेला मतदार हा जितका कारणीभूत ठरला, तितकेच पक्षाचे चिन्हही प्रभावी ठरले. बहुतांश मतदारांनी उमेदवारापेक्षा पक्षाला मत दिल्याचे दिसते. 

या प्रभागातील हरिदास चरवड, राजश्री नवले, नीता दांगट आणि राजाभाऊ लायगुडे हे चारही उमेदवार मूळचे भाजपचे नाहीत. चरवड यांचा कॉंग्रेस, तर राजश्री नवले आणि अनिता दांगट यांचा परंपरागत राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष होता. तसेच लायगुडे हे गेल्यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाटेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अशा सर्वांना पक्ष प्रवेश देऊन भाजपने चार आयात उमेदवारांचे भक्कम पॅनेल तयार केले होते. त्यामुळेच खडकवासलाचा किल्ला राखता आला. 

या प्रभागाचा चेहरा-मोहरा गेल्या पाच वर्षांमध्ये बदलला आहे. त्यामुळे गावकी-भावकीच्या राजकारणाची शक्ती क्षीण झाली. नव्याने स्थलांतर करून शहरात आलेले आणि शहरातील पेठांमधून या भागातील नव्या सोसायट्यांमध्ये वास्तव्यास आलेले नागरिक यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बदललेल्या मतदारांनी उमेदवारापेक्षा पक्षाला प्राधान्य दिले. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले उमेदवार बहुमताने विजयी झाल्याचे स्पष्ट होते. 

तरुण आणि शिकलेला मतदार हे या प्रभागाचे वैशिष्ट्य होते. या मतदारांनी आपला कौल भाजपला दिला. राष्ट्रवादीच्या विकास दांगट यांनी या प्रभागाच्या "ड' गटातून मनसेचे विद्यमान नगरसेवक लायगुडे यांना मोठे आव्हान दिले होते. वडगाव बुद्रुक भागातून दांगट यांना यश मिळत असतानाच धायरीचा मोठा भाग लायगुडे यांच्याबरोबर राहिला. त्यामुळे या प्रभागातून भाजपचे पॅनेल विजयी झाले. 

Web Title: BJP game a success