महापालिकेतील चारही समित्यांवर भाजपचे सदस्य

महापालिकेतील चारही समित्यांवर भाजपचे सदस्य

पुणे - महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे महेश लडकत, ॲड. गायत्री खडके, राणी भोसले आणि सम्राट थोरात यांची निवड शुक्रवारी झाली. तर, उपाध्यक्षपदी किरण दगडे पाटील, जयंत भावे, ज्योती गोसावी आणि श्‍वेता खोसे- गलांडे यांची निवड झाली. चारही समित्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. पीठासीन अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीच्या बडग्यात ही निवडणूक सुरळीत पार पडली.

महापालिकेच्या चारही विषय समित्यांच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. चारही समित्यांमध्ये प्रत्येकी १३ सदस्य आहेत. त्यात भाजपचे प्रत्येकी ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. समित्यांमध्ये भाजच्या सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी त्यांच्याच उमेदवारांची निवड होणार असल्याचे या पूर्वीच निश्‍चित झाले होते. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून चार समित्यांच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविली. समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे चारही समित्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष- उपाध्यक्ष ८ विरुद्ध ४ मतांनी विजयी झाले. आघाडीकडून भैय्यासाहेब जाधव, ॲड. हाजी गफूर पठाण, सुमन पठारे, प्रदीप गायकवाड, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकर, शेख रफिक अब्दुल रहीम, बाळाभाऊ ऊर्फ किशोर धनकवडे यांनी निवडणूक लढविली. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी होते. नगरसचिव सुनील पारखी यांनी त्यांना सहाय्य केले. निवड झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचे महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अभिनंदन केले. 

मुंढे यांचा शिस्तीचा बडगा 
विषय समित्यांच्या निवडणुकीच्या वेळी समितीच्या सदस्यांखेरीज कोणालाही संबंधित सभागृहात उपस्थित राहता येणार नाही. तसेच सदस्यांनी स्वतःचे ओळखपत्र जवळ बाळगावे, अशी सूचना पीठासीन अधिकारी म्हणून मुंढे यांनी केली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर महापौर टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे हे सभागृहात गेले. परंतु, अन्य राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना प्रवेश नसल्यामुळे त्यांनीही आपआपल्या केबिनमध्ये थांबणे पसंत केले. निवडणुकीची प्रक्रिया कडेकोट बंदोबस्तात पार पडली. महापालिकेत या पूर्वी असे कधी झाले नव्हते, असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते तर, कायद्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. 

राजकीय टीका-टिप्पणी 
‘सभागृहात महापौरांना प्रवेश दिला नाही म्हणून महापालिकेच्या इतिहासात हा काळाकुट्ट दिवस आहे’, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी व्यक्त केली. तर, ‘महापौरांना सभागृहात प्रवेश देण्यात आला होता. परंतु, गटनेते नसल्यामुळे त्या बाहेर आल्या,’ असा खुलासा सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी केला. निवडणूक सुरळीत पार पडल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.   

काही नगरसेवक रागावले! 
मुंढे यांनी नगरसेवकांना ओळखपत्र जवळ बाळगण्यास सांगितले होते. ‘माननीयांना ओळखत नाही का,’ या भावनेने त्याचा अनेक नगरसेवकांना राग आला होता. त्यामुळे २-३ नगरसेवकांनी मुंढे यांच्याकडेच ‘अगोदर तुमचे ओळखपत्र दाखवा’, अशी विचारणा केली. तेव्हा मुंढे यांनी त्यांचे ओळखपत्र सादर केले. एका नगरसेविकेने तर, ‘तुमची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे, त्याचा आदेश दाखवा’ अशीही मागणी केली. एका नगरसेवकाने नगरसचिवांनाही ओळखपत्र दाखविण्यास फर्मावले. निवडणुकीदरम्यान काही नगरसेवकांचे ‘असे’ वर्तन हा महापालिकेत चर्चेचा विषय ठरला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com