भाजपमध्ये पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा...

अविनाश चिलेकर
सोमवार, 23 जानेवारी 2017

तत्त्व, निष्ठा, विचारांची बैठक असलेला मूळचा भाजप आयाराम मंडळींनी हायजॅक केल्याचे चित्र शहरात आहे. आज मोदी-फडणवीसांच्या ब्रॅंडची चलती आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी बाहेरची मंडळी घुसली. आता भाजप ही खरोखरच ‘बनियों की पार्टी’ झाली. कारण, धंदापाणीवाले सर्व आले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील निष्ठावंत मंडळींची अवस्था पाहून आता मतदारराजालाच कीव यायला लागली आहे. रात्रीचा दिवस केला तेव्हा कुठे सत्ता आली. आज सुगीचे दिवस आले. इथे तीस-चाळीस वर्षे काँग्रेसच्या विरोधात मार खाल्ला. खस्ता खाऊन ज्यांनी हे रोपटे जगवले, त्यापैकी एकही नेता आज पडद्यावर दिसत नाही. तत्त्व, निष्ठा, विचारांची बैठक असलेला मूळचा भाजप आयाराम मंडळींनी हायजॅक केल्याचे चित्र शहरात आहे. आज मोदी-फडणवीसांच्या ब्रॅंडची चलती आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी बाहेरची मंडळी घुसली. आता भाजप ही खरोखरच ‘बनियों की पार्टी’ झाली. कारण, धंदापाणीवाले सर्व आले.

‘ते’ भाजपचे नेते गेले कुठे?  
उद्योगनगरीत भाजपची मुळे कशी रुजली, कोणी खतपाणी खातले हा आता इतिहास आहे. ती तळमळ तीस वर्षे जवळून पाहण्याचा योग आला. आज त्यापैकी एकही नेता अथवा कार्यकर्ता पक्षाच्या चर्चा, मोर्चा, बैठका अथवा निर्णयात कुठेच दिसत नाही. भाजपच्या कट्टरपंथी कार्यकर्त्या डॉ. प्रतिभा लोखंडे यांनी दोन वेळा बारामतीच्या बुरुजाला धडका दिल्या. संघाचे बाळकडू तसेच प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे समर्थन त्यांना मिळाले. आजही त्यांची तडफ कायम आहे; पण त्यांचा विसर पडला. 

ज्येष्ठ पत्रकार, कामगारनेते आणि फर्डे वक्‍ते असलेल्या मधू जोशी यांनी निवडणूक प्रचाराची अनेक मैदाने गाजवली. त्यांनाही आजच्या आयारामांचा संग पसंत असेल असे वाटत नाही. पडत्या काळात मामनचंद आगरवाल यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. पूर्वाश्रमीचे भाजपचेच पण दहा वर्षे राष्ट्रवादीत राहून स्वगृही परतलेले ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचाही संघटनेच्या विस्तारात वाटा आहे; पण त्यांनाही विश्‍वासात घेतले नाही. दोन वेळा नगरसेवक होऊनही कायम जमिनीवर राहिलेल्या डॉ. गीता आफळे यांचे आता कुठेही नाव-गाव शिल्लक नाही. 

तुकाराम जवळकर, अमृत पऱ्हाड, दिवंगत अंकुश लांडगे यांनी शेठजी भटजींचा हा पक्ष गावकीत आणि बहुजनांत रुजवला. पुढच्या पिढीसाठी पायाही मजबूत केला. एकनाथ पवार, महेश कुलकर्णी, सदाशिव खाडे, उमा खापरे, प्रमोद निसळ यांनी दहा वर्षांत पाणी घालत भाजप जगवला. आजच्या युतीच्या बैठकीत यापैकी एकही नेता अथवा कार्यकर्ता शोधूनही सापडला नाही. खासदार अमर साबळेंचा एक अपवाद वगळला, तर मित्रपक्ष शिवसेनेशी चर्चा करायला कोण होते... 

आझमभाई पानसरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे. अगदी अलीकडे हे सर्व राष्ट्रवादीचेच निस्सीम भक्त होते. चर्चा भाजपच्या जागावाटपाची होती आणि खाडे, खापरे, पवार, अमोल थोरात हे निष्ठावंत बाहेर दारात होते. काय दिवस आले पाहा. जुन्यापैकी एकाने गप्पांच्या ओघात मार्मिक भाषेत नवीन भाजपचे वर्णन राष्ट्रवादीची ‘बी’ टीम असे केले. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा... दुसरे काही नाही, असाही शालजोडीतील शेरा आला.

निष्ठावंत म्हणतात ‘आमचे काय’?
भाजपधील निष्ठावंतांचा गट अस्वस्थ आहे; मात्र गळ्यात घंटा, पायात लोढणे बांधल्याने आता त्यांचीही बोलती बंद झाली आहे. मागच्या वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुकीला जे जे अनंत ‘उपकार’ परकीयांना केले, त्या दबावाखाली या निष्ठावंतांचा आवाज गेला. आज आयात नेत्यांना खाली वाकून पाणी देण्यापुरती त्यांची किंमत राहिली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी युती झालीच, तर ४८ पैकी ३५ जागा माझ्या समर्थकांना पाहिजेत, असे सुरवातीलाच ठणकावले. आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड मतदारसंघातून आपल्या समर्थकांसाठी ४० ते ५० जागा हव्यात. नुकतेच पक्षात आलेले आझमभाई पानसरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व समर्थक भाजपमध्ये येणार आहेत. त्यांच्यासाठी सुमारे २० जागांचा प्रस्ताव आहे. म्हणजे १२८ पैकी किमान १०० जागांवर आयात कार्यकर्त्यांची वर्णी लागणार आहे. त्यात आता भाजप निष्ठावंतांचे धाबे दणाणले. कुठलाही विचार, परिणामांची तमा न बाळगता लोंढे घरात घेतले. आता ‘आमचे काय’ म्हणायची वेळ निष्ठावंतांवर आली. राष्ट्रवादीतील उरलेसुरले दुसऱ्या फळीतील नेते, नगरसेवक, कार्यकर्तेही रांगेत आहेत. फक्त रंगमंच बदलला, कलाकार तेच आहेत. सत्तेच्या नादात आता रा. स्व. संघालाही पश्‍चाताप होतो आहे. कपाळमोक्ष झाला. कारण, या परिवर्तनात तीच संस्कृती इकडेही आली. आता कोण कोणाला बदलणार ते मतदार पाहतात.

Web Title: bjp politics