जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - नगरपरिषदांच्या निवडणूक निकालांतून पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची लक्षणीय ताकद वाढल्याचे अधोरेखित झाले आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्‍वास दाखविला आहे. आगामी महापालिका निवडणुकांतही हाच कल कायम राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या 223 जागांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसला 84, भाजप आघाडीला 41, कॉंग्रेस आणि स्थानिक आघाड्यांना 41, शिवसेना आणि पुरस्कृत 21, स्थानिक आघाड्यांना 26, तर अन्य घटकांना 10 जागा मिळाल्या आहेत. नगरपरिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसला स्थानिक आघाड्यांसह प्रत्येकी तीन ठिकाणी, शिवसेनेला एक आणि स्थानिक आघाड्यांना दोन ठिकाणी यश मिळाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर बापट म्हणाले, 'जिल्ह्यात यापूर्वी भाजपकडे फक्त 9 सदस्य होते. मात्र, या निवडणुकीत 41 हून अधिक ठिकाणी यश मिळाले आहे. पूर्वी आमच्याकडे एकाही नगरपरिषदेचे अध्यक्षपद नव्हते. या वेळी लोणावळा, तळेगाव आणि आळंदीमध्ये पक्षाला यश मिळाले आहे, त्यामुळे जिल्ह्यात भाजपची वाढ लक्षणीय झाली आहे. भाजपने या वेळी पक्षाच्या चिन्हावर 129 उमेदवार आणि सुमारे 40 ठिकाणी घटक आणि मित्रपक्षांना पुरस्कृत केले होते. मतांच्या टक्केवारीत भाजप जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर पोचला आहे.'' याप्रसंगी गोगावले, अनासपुरे, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणून गेला दीड महिना जिल्ह्यात पक्षाचा प्रचार केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री शेवटच्या टप्प्यात प्रचारासाठी आले. जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्यासह सुमारे 1500 कार्यकर्त्यांची फळी झटत होती. या संघटित प्रयत्नांमुळेच भाजपची जिल्ह्यात लक्षणीय ताकद वाढली. पुढील लक्ष्य महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर असेल.
- गिरीश बापट, पालकमंत्री