भाजपचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पिंपरी - शहरात होणाऱ्या विविध विकासकामांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.28) महापालिका भवनासमोर सुमारे तासभर ठिय्या आंदोलन आणि निदर्शने केली. 

पिंपरी - शहरात होणाऱ्या विविध विकासकामांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.28) महापालिका भवनासमोर सुमारे तासभर ठिय्या आंदोलन आणि निदर्शने केली. 

विठ्ठल मूर्ती, सीएनजी गॅसदाहिनी खरेदी, स्थायी समिती सभेत आयत्या वेळी मंजूर झालेले 135 कोटींच्या वाढीव खर्चाचे विषय आदी प्रमुख मुद्यांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शरसंधान केले. विरोधकांनी भ्रष्टाचार सिद्ध करावा, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिल्यानंतर भाजपतर्फे लगोलग बुधवारी (ता. 28) महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले. '135 कोटी वाढीव निधीचा हिशेब मिळालाच पाहिजे', "जनता की है यही ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार' असे फलक हातात घेऊन भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, नगरसेवक विजय शिंदे, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, चंद्रकांता सोनकांबळे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, शहर उपाध्यक्ष नामदेव ढाके, माजी नगरसेवक अशोक सोनवणे, भीमा बोबडे, अनुप मोरे, ऍड. मोरेश्‍वर शेडगे आदींनी आंदोलनात भाग घेतला. आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

सावळे म्हणाल्या, ""दहा वर्षांत महापालिकेतील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे आम्ही समोर आणली. कधी आंदोलन करून; तर कधी उच्च न्यायालयात जाऊन त्यासाठी पाठपुरावा केला. स्थायी समिती सभेत 135 कोटी रुपयांचे ऐनवेळचे विषय आणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने गैरव्यवहारासाठी नवे कुरण शोधले आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. गरज पडल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील तक्रार करू.'' 

पवार म्हणाले, ""सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून शहराला वाचविण्यासाठी आम्ही यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू.'' 

शेंडगे म्हणाल्या, ""महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मूग गिळून गप्प आहेत.''