भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची २६,२७ रोजी बैठक 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची २६,२७ रोजी बैठक 

पिंपरी - भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पिंपरी- चिंचवड शहरात होणाऱ्या त्रैमासिक दीर्घ बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, तसेच अन्य काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भुईसपाट केल्यानंतर या पक्षाने पुन्हा डोके वर काढू नये यासाठी महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपचे पाय या बैठकीच्या माध्यमाद्वारे शहरात आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. येत्या २६ व २७ एप्रिलला ही बैठक होणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीचे एक हजाराहून अधिक सदस्य, मंत्रिगण, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याचे समजते.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात शिवसेनेसकट विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात योगी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज आणखी प्रखर झाला. त्यात शिवसेनेनेही सुरात सूर मिसळल्याने राज्य सरकार काही काळापुरते अडचणीत आले होते. त्यामुळे या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची दाट शक्‍यता आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांमध्ये बदल होणार असल्याचे सूतोवाच केले आहे, त्यामुळे त्यांचे कोण मंत्री बदलले जातात आणि कोणते नवे चेहरे येतात, त्यांच्या बदलाबरोबर भाजपच्याही काही मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक पाहून नवे चेहरे किंवा खांदेपालट होण्याची शक्‍यता आहे. याबाबतही बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नवी दिल्लीत नुकतीच एनडीएची बैठक बोलावली होती, त्याला शिवसेना पक्षप्रमुखही उपस्थित होते. शिवसेना घटकपक्ष असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकाही युती म्हणून एकत्र लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र लढण्याची तयारी असली तरी स्थानिक नेत्यांना मुरड घालण्याची तयारी दर्शवावी लागणार आहे. सध्यातरी पक्षाचे सर्व कार्यकर्ते या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या आयोजनाच्या कामाला जुंपले आहेत.

पस्तीस वर्षांनंतर पिंपरीत बैठक
१९८२-८३ मध्ये पिंपरी- चिंचवडला पहिल्यांदा भाजप प्रदेश कार्यकारिणीची त्रैमासिक बैठक झाली होती. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी ही बैठक शहरात होणार आहे. त्या वेळी पिंपरी- चिंचवड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष श्री. श्री. घारे, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे चेतनदास मेवाणी होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष उत्तमराव पाटील, तसेच प्रा. ना. स. फरांदे, सूर्यभान वहाडणे, दिवंगत ज्येष्ठ नेते अण्णा जोशी, अरविंद लेले आदी मान्यवर त्या वेळी उपस्थित होते. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर मात्र येथे काँग्रेस आणि गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com