भाजपची त्सुनामी

भाजपची त्सुनामी

स्वबळावर सत्ता; राष्ट्रवादीला रोखण्यात स्थानिक नेते यशस्वी
- मिलिंद वैद्य
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची अक्षरशः त्सुनामीची लाट पाहावयास मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 32 प्रभागांतून 128 पैकी 78 जागा मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत संपादन केले. या निकालाने गेल्या वीस वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला पिंपरी-चिंचवडकरांनी खुर्चीवरून खाली खेचले. मुख्यमंत्र्यांची कुशल व स्वच्छ प्रतिमा, पालकमंत्री गिरीश बापट यांचे मार्गदर्शन आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या संघटित नेतृत्वाचे हे यश मानले जाते. कॉंग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.

सामूहिक नेतृत्वावर विश्‍वास
या निवडणुकीत 128पैकी भाजपला 78, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 36, शिवसेनेला 9, मनसे 1; तर अपक्षांना 4 जागा मिळाल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील एकेक प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य घातले. भोसरीत त्यांची झालेली सभा आश्‍वासक होती. या संधीचा लाभ घेत आमदार महेश लांडगे यांनी भोसरीचे व्हिजन जनतेपुढे मांडले आणि कुशलतेने यश खेचून आणले. तेथे भाजपला 42 पैकी 32 जागा मिळाल्या. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 34 व आझम पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी विधानसभा मतदारसंघात 12 जागांवर विजय मिळविला आहे.

सुप्त लाट असल्याचे स्पष्ट
मातब्बर वाटणारे उमेदवार पराभूत झाले. ज्यामध्ये महापौर शकुंतला धराडे, भाऊसाहेब भोईर, सुलभा उबाळे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, विलास नांदगुडे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम जेमतेम 600 मतांनी विजयी झाल्या. यावरून शहरात भाजपची सुप्त लाट होती, हे स्पष्ट होते.

राज्य व केंद्राच्या कारभारावर विश्‍वास
राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या वीस वर्षांत शहराचा विकास केला. त्यापेक्षा त्यांचा भ्रष्ट कारभार व घोटाळ्यांचीच अधिक चर्चा झाली. त्यामुळे जनता पर्याय शोधत होती. केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी जो कारभार केला, त्यावर जनतेने विश्‍वास ठेवला. पिंपरी चिंचवडचे प्रश्‍न भाजपचे सरकार मार्गी लावू शकते, असा विश्‍वास निर्माण झाल्यानेच जनतेने भाजपच्या पारड्यात दान टाकत भ्रष्टाचाराविरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादीची गळती थांबली नाही

शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्या वर्षभरापासूनच गळती लागली होती. ती रोखण्याचे अजित पवार यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्याला अपयश आले. त्यांच्या हुकमी स्वभावामुळे अनेक नेते व कार्यकर्ते दुखावले. वेळोवेळी दिलेली आश्‍वासने त्यांच्याकडून पाळली गेली नाहीत. अडीच-पावणेतीन वर्षांपूर्वी लक्ष्मण जगताप यांनी "राष्ट्रवादी'ला राम-राम केला. त्यांनी भाजपमधून विधानसभा निवडणूक लढवून आमदारकी मिळवली. त्यानंतर आमदार महेश लांडगे व आझम पानसरे यांनीदेखील "राष्ट्रवादी'ला राम-राम ठोकला. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला फटका बसला आहे.

नोटाबंदीचा परिणाम नाही
"विकासाला मत' या राष्ट्रवादीच्या प्रचाराला जनता बळी पडली नाही. त्यामुळे शहरात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले दिसते. नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या गोष्टीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपप्रचार केला तोही जनतेला रुचलेला दिसत नाही. नोटाबंदीचे जनतेने स्वागत केले, हे आजच्या निर्णयावरून स्पष्ट होते.

घोटाळ्यांना वैतागली जनता
गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महापालिकेतील कारभार चव्हाट्यावर आला होता. वायसीएम रुग्णालयातील एचबीओटी मशिन खरेदी असो की, गॅस शवदाहिनीचा घोटाळा, अगदी विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती खरेदी घोटाळा, एमआयडीसीतील साई उद्यानात केलेले अनधिकृत बांधकाम, सेक्‍टर 22 मधील पुनर्वसन प्रकल्पातील बोगस लाभार्थी, या सर्व घोटाळ्यांना जनता वैतागली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com