हुकुमशाहीची बिजे रुजविण्याचा भाजपचा प्रयत्न - अजित पवार

sabha
sabha

बारामती (पुणे) : विरोधकांकडे सर्वाधिक दुर्लक्ष करणारे पंतप्रधान व सरकार भाजपचे आहे, हुकुमशाहीची बिजे रुजविण्याचा भाजपचा प्रयत्न या देशातील लोकच हाणून पाडतील, मोदीलाट ओसरु लागली असून परिवर्तन निश्चित घडेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्यस्तरीय ओबीसी जनजागृती अभियानाचा समारोप आज बारामतीत झाला. त्या प्रसंगी पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, संविधान बदलण्याची भाषा करणारे हे सरकार जातीयवादी आहे, सोळा मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढूनही सरकार हलायला तयार नाही, राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र त्यांना दिलासा देण्यासाठी अजूनही सरसकट कर्जमाफी दिली जात नाही, सर्वांनी एकत्रितपणे प्रतिकाराची ताकद वाढवून या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

स्वताःला देशाचे चौकीदार व रखवालदार म्हणून घेणा-या पंतप्रधानांच्या देखत नीरव मोदी, विजय मल्ल्या, चोक्सी यांनी देश लुटून नेला, तरी हे सरकार काहीही करु शकले नाही, या देशाचे पंतप्रधानच जर उपोषणाला बसू लागले तर देशवासियांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे असे म्हणत त्यांनी उपोषणाची खिल्ली उडविली. 

ओबीसी, अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना आरक्षण देणे दूरच उलट त्यांचे आहे हे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी केला. समाजाच्या विविध घटकात दुफळी माजविण्याचे पध्दतशीर काम सरकार करत आहे, मात्र आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न झाला तर समाज पेटून उठेल, असा इशारा त्यांनी दिला. ज्यांना आरक्षण मान्यच नाही अशा विचारधारेच्या मागे सरकार जात आहे हे दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. 

आमदार रामराव वडकुते यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ओबीसी समाज या पुढील काळात राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल अशी ग्वाही दिली. 

प्रास्ताविकात राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी या जनजागृती अभियानाची पार्श्वभूमी विशद केली. ओबीसींच्या प्रश्नांकडे पाहण्यास या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वेळच नसल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिलाध्यक्षा वनिता बनकर व अनिता गायकवाड यांनी स्वागत केले. 

पश्चिम महाराष्ट्रातील हल्ला बोल आंदोलनाचा समारोप राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी म्हणजे 10 जून रोजी पुणे शहरात करणार असल्याचे अजित पवार यांनी या वेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com