बीआरटी प्रोजेक्‍ट गुंडाळणार?

- संदीप घिसे
शनिवार, 4 मार्च 2017

पिंपरी - निगडी- दापोडी हा बीआरटीचा पायलट प्रोजेक्‍ट म्हणून महापालिकेने २००८ मध्ये हाती घेतला. आतापर्यंत जवळपास १४.७० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च केले आहेत. आता मेट्रोच्या पिलरसाठी बीआरटीची ही जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव मेट्रोच्या सर्व्हेक्षणातून पुढे आला आहे. यामुळे महापालिकेचा हा पायलट प्रोजेक्‍ट गुंडाळण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.

पिंपरी - निगडी- दापोडी हा बीआरटीचा पायलट प्रोजेक्‍ट म्हणून महापालिकेने २००८ मध्ये हाती घेतला. आतापर्यंत जवळपास १४.७० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च केले आहेत. आता मेट्रोच्या पिलरसाठी बीआरटीची ही जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव मेट्रोच्या सर्व्हेक्षणातून पुढे आला आहे. यामुळे महापालिकेचा हा पायलट प्रोजेक्‍ट गुंडाळण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.

निगडी ते दापोडी हा दुहेरी २५ किलोमीटरचा बीआरटी मार्ग करावा, यासाठी २००८ मध्ये महापालिकेने पथदर्शी प्रकल्प म्हणून हाती घेतला. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. केंद्राने २०१० मध्ये प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला वेग आला. या मार्गावरील एकूण ३६ बस थांब्यांपैकी १४ बस थांबे हे बीव्हीजीने उभारून दिले, तर उर्वरित बस थांबे महापालिकेने साडेनऊ कोटी रुपये खर्च करून उभारले. बस थांब्याचे ८० टक्‍के काम पूर्ण झाले आहे.

पिंपरी ते स्वारगेट असा मेट्रोचा पहिला टप्पा होणार आहे. या कामाची पाहणी मेट्रोच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केली. निगडी ते दापोडी या मार्गावरील बीआरटीसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर मेट्रोचे पिलर उभारण्याचे नियोजन आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी तोंडी चर्चाही झाली आहे. मेट्रोचे पिलर उभारण्यासाठी हीच जागा योग्य असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र महापालिका त्यास विरोध करीत आहे.

सेवारस्त्याच्या बाजूला ग्रीन कॉरिडॉर राखीव असून तो मेट्रोसाठी वापरावा, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र या ठिकाणी मेट्रोचे पिलर उभारल्यास इमारतीच्या अगदी जवळून मेट्रो जाणार आहे. हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका कायम ठेवल्यास महापालिकेला बीआरटी प्रकल्प गुंडाळण्याखेरीज पर्याय उरणार नाही.

‘बीआरटी’ सुरू करण्याची तयारी
बीआरटी प्रकल्प प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने ॲड. हिंमतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात पीएमपीएमएल विरोधात याचिका दाखल केली. त्यानंतर महापालिकेने या मार्गाच्या सुरक्षिततेसाठी आयआयटी पवई यांच्याकडून सेफ्टी ऑडिट करून घेतले. त्यामध्ये आलेल्या सूचनेनुसार आवश्‍यक ते बदल केले. बीव्हीजीने बांधलेले बस थांबे हे महापालिकेने बीआरटीसाठी तयार केलेल्या निकषाप्रमाणे नसल्याने त्यामध्ये आणखी कामे करणे आवश्‍यक आहे. या थांब्यांवरील उर्वरित कामे करून घेण्यासाठी महापालिकेने एक कोटी ७५ लाखांची निविदा काढली आहे. तर सर्व बस थांब्यांवर ॲटोमॅटिक दरवाजा बसविणे, विद्युत विषयक कामे करणे, दिशा दर्शक फलक लावणे, या कामासाठी साडेतीन कोटींचा खर्च येणार आहे. त्यानंतरच बीआरटी मार्ग सुरू करता येणार आहे. या कामासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, निगडी ते दापोडी बीआरटी मार्ग २०१३ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने बॅरिकेट्‌स उभारून राखीव ठेवला आहे. या मार्गावरून इतर वाहनांना परवानगी देण्यात आलेली नाही, तसेच बीआरटी प्रकल्पही सुरू केलेला नाही. हा मार्ग काही दिवसांकरिता सुरू करण्याचे सूतोवाच महापालिका अधिकाऱ्यांनी केले आहे.

पुणे मेट्रोच्या पिलरसाठी बीआरटीची जागा द्यावी, अशी मेट्रोच्या अधिकाऱ्यांची तोंडी मागणी आहे. याबाबत लेखी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, ही जागा देण्यास आमचा विरोध आहे. मेट्रोच्या पिलरसाठी ग्रीन कॉरिडॉरमधील जागा वापरावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- विजय भोजने, प्रवक्‍ते-बीआरटी प्रकल्प

Web Title: brt project