बीआरटी मार्ग वाढविणार

बीआरटी मार्ग वाढविणार

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी सुमारे ४६ किलोमीटरचे बीआरटी मार्ग यंदाच्या वर्षात नव्याने उभारण्यात येणार आहेत, तर प्रदूषण कमी व्हावे, यासाठी सायकल आराखडा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातंर्गत ३०० किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. पादचारी आणि वाहनतळाच्या धोरणाचीही अंमलबजावणी करण्याचा महापालिकेचा मानस आहे. मेट्रोला पूरक पीएमपीच्या मार्गांचे नियोजन करण्यात येणार असून, त्यातंर्गत ‘मी’ कार्डचीही अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

स्मार्ट सिटीचे सर्वेक्षण करताना शहरातील ३३ टक्के नागरिकांनी वाहतुकीची समस्या तीव्र असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे महापालिकेच्या २०१७-१८ या वर्षाच्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब पडले आहे. वाहतुकीच्या एकूण प्रकल्पांसाठी महापालिकेने सुमारे ७०१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद कायम राहिल्यास शहरातील वाहतुकीच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. 

यंदाच्या वर्षात महापालिकेला ४६ किलोमीटरचे बीआरटी मार्ग कार्यान्वित करायचे आहेत. त्यातील २१ किलोमीटरपैकी सातारा रस्त्याचे फेररचनेचे काम सुरू झाले आहे. पुणे विद्यापीठ ते औंध आणि जुना पुणे- मुंबई रस्त्यावरही बीआरटीचे काम सुरू झाले आहे. या पूर्वी संगमवाडी ते विश्रांतवाडी चौक या ७ किलोमीटरच्या आणि येरवड्यातील पर्णकुटी चौक ते नगर रस्त्यावरील खराडी दरम्यानच्या ९ किलोमीटरच्या रस्त्यावर वाहतूक सुरू झाली आहे. बीआरटी मार्गावर वाहतुकीसाठी अधिक बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ५०० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, जूनपासून त्या बस टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने रावेत ते सांगवी फाटा आणि निगडी ते दापोडी दरम्यान बीआरटी मार्ग सुरू केला आहे. या मार्गाशी संलग्न पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये औंधमधील राजीव गांधी पूल ते सिमला ऑफिस दरम्यानच्या ६.५ किलोमीटरच्या आणि हॅरिस पूल ते पाटील इस्टेट चौकापर्यंतच्या ५.७ किलोमीटरच्या बीआरटी मार्गाचे विकसन करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

शहर- उपनगरात सायकल चालवा 
भाडेतत्त्वावरील सायकल योजनेतंर्गत शहरात ६८० अत्याधुनिक स्टेशन होणार असून, त्यासाठी सुमारे ७ हजार सायकली खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ३८८ स्टेशन्स होणार असून, त्यासाठी ४६५० सायकली वापरण्यात येतील. शहराचा मध्यभाग, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी, धनकवडी, सहकारनगर, सिंहगड रस्ता, एरंडवणा, गणेशखिंड रस्ता आणि येरवडा या भागात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. शहरात सध्या ७१ किलोमीटरचे सायकल ट्रॅक असे आहेत, की ते दुरुस्त करून वापरता येतील. ३०० किलोमीटरचे नव्याने सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहेत. त्यातील महत्त्वाच्या मोठ्या आणि गर्दीच्या रस्त्यावर १४५ किलोमीटरचे स्वतंत्र सायकल ट्रॅक, ज्या रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक करणे शक्‍य नाही, तेथे ५९ किलोमीटरचे रंगीत ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. तर ज्या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत, तेथे एकत्रित १३२ किलोमीटरचे सायकल ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, निविदा प्रक्रियेत ९ राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भाग घेतला आहे. 

पादचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी रुंद पदपथ असलेले १०० किलोमीटरचे परिपूर्ण रस्ते उभारण्यात येणार आहेत. त्यातील ३० किलोमीटरच्या रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शहरातील पहिले काम सध्या जंगली महाराज रस्त्यावर सुरू झाले आहे. या रस्त्यावर रुंद पदपथाबरोबरच सायकल ट्रॅकही असेल.  
 ३५ किलोमीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा उच्चक्षमता वर्तुळाकार रस्त्याचा (एचसीएमटीआर) प्रकल्प आराखडा तीन महिन्यांत केंद्र सरकारला सादर करणार 
 वाहनतळ धोरणाची अंमलबजावणी करणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com