बीआरटीएस मार्ग दुचाकींसाठी खुला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

पिंपरी - मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटीएस मार्ग फक्‍त दुचाकी वाहनांसाठी सोमवारपासून (ता.20) खुला करण्यात आला.

पिंपरी - मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटीएस मार्ग फक्‍त दुचाकी वाहनांसाठी सोमवारपासून (ता.20) खुला करण्यात आला.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी निगडी ते दापोडी हा बीआरटीएस मार्ग दुचाकीसाठी खुला करण्याची मागणी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, आयुक्त वाघमारे यांनी हा मार्ग दुचाकींसाठी खुला करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बीआरटी बससेवा सुरू होईपर्यंत हा मार्ग दुचाकी वाहनांसाठी खुला राहणार आहे.

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. यामध्ये औंध ते किवळे, निगडी ते दापोडी, नाशिकफाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता आणि देहू ते आळंदी, अशा पाच मार्गांचा समावेश आहे. त्यापैकी औंध-किवळे या मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू आहे. परंतु, सर्वांत प्रथम निगडी ते दापोडी या साडेबारा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचे नियोजन कोलमडले आहे.

दरम्यान, अनेक बीआरटीएस मार्ग दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आल्याचे माहीत नसल्याने थोडेच दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. चारचाकी वाहने या मार्गावर जाऊ नये, यासाठी या मार्गाच्या सुरवातीस लोखंडी खांब बसवण्यात आले आहे. मात्र फिनोलेक्‍स चौकातून चिंचवडकडे जाताना लोखंडी खांबांना केबल लावल्याने तो पट्टा बंदच आहे.

सूचना फलक लावणे गरजेचे
बीआरटीएस मार्ग दुचाकी वाहनांसाठी खुला असल्याचा सूचना फलक मार्गाच्या सुरवातीस लावणे गरजेचे आहे. या मार्गाच्या सुरवातीला काही ठिकाणी रिक्षा थांबत असल्याने दुचाकीस्वारांना त्या मार्गावरून जाताना अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर मार्गाच्या सुरवातीस रिफ्लेक्‍टर बसवणे गरजेचे आहे, जेणेकरून अपघात होणार नाहीत.

'या मार्गावरून फक्त दुचाकी वाहनेच जाऊ शकतील, अशी व्यवस्था केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या जूनपासून या मार्गावर बस धावणार आहेत.''
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस

Web Title: brts route open for two wheeler