थायलंडमधील बुद्ध मूर्तींची शहरातील विहारांत प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

पिंपरी - काही वर्षांपूर्वी थायलंडवरून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या नरोंग सकाइव्ह या थाई भिक्‍खूने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विहारांना सव्वापाच फुटी बुद्ध मूर्ती दान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सहा वर्षांपासून लाखो रुपये किमतीच्या बुद्ध मूर्ती विनामूल्य भेट देण्याचा हा उपक्रम अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यंदा बुद्ध पौर्णिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील तीन बुद्ध मूर्ती दाखल झाल्या असून, त्यांची उद्या (ता. १०) मिरवणूक काढून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

पुणे विद्यापीठात शिकत असताना नरोंग सकाइव्ह पुण्यातील बौद्ध धर्मीयांच्या सहवासात आले. पुण्यामधून शिकून गेल्यावर पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील आकाराने मोठ्या विहारामध्ये बुद्ध मूर्ती नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यांनी थायलंडमधील दानशूर थाई उपासकांना व थाई अनुयायांना आवाहन करून पुण्यासह आजूबाजूच्या परिसरातील बुद्ध विहारांना या सव्वापाच फूट उंचीच्या व साधारण अडीचशे किलो पितळेच्या बुद्ध मूर्ती दान करण्याचे कार्य हाती घेतले. या उपक्रमाला २०११ मध्ये नसरापूरमधून सुरवात झाली. आजपर्यंत सुमारे ५०पेक्षा अधिक मूर्तींचे वाटप केले आहे. यासाठी केवळ नाममात्र ‘कस्टम ड्युटी’ विहारांना भरावी लागते. थायलंडवरून आलेल्या या मूर्ती खडकी-रेंजहिल्समधील शताब्दी बुद्ध विहारात उतरविल्या जातात. विहाराच्या मागणीनुसार व पाहणी केल्यानंतर त्या-त्या विहारांकडे त्या सुपूर्द केल्या जातात. त्यापैकी सहा मूर्ती पिंपरी-चिंचवड शहरातील बुद्ध विहारांना दिल्या आहेत. त्यापैकी तीन मूर्तींची यंदा संत तुकारामनगरमधील पंचशील संघ बुद्धविहार, आनंद बुद्ध विहार रहाटणी-नखातेवस्ती आणि काळेवाडीतील तक्षशिला बुद्ध विहारात मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष शरद जाधव यांनी सांगितले.

शहरात निवडक उपक्रम
दापोडी येथील त्रिरत्न बौद्ध महासंघ धम्मचक्र प्रवर्तन महाविहारात सकाळी सात वाजता सामूहिक ध्यानधारणा, गौतम बुद्ध प्रतिमा पूजा होईल. सकाळी अकरा वाजता बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम होईल. सायंकाळी पावणेसात वाजता धम्मचारी जीनरक्षित श्रद्धा विषयावर प्रवचन सादर करतील. 

संत तुकारामनगरमधील पंचशील बुद्ध विहारात सकाळी साडेनऊ वाजता पंचशील ध्वजवंदन करण्यात येईल. वंदना व बुद्धरूप प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

शाहूनगरमधील धम्मचक्र बुद्धविहारात सकाळी दहा वाजता बुद्धवंदना, एस. के. गणवीर गौतम बुद्धांच्या जीवनावर प्रवचन होईल. सायंकाळी सहा वाजता परिसरातून मिरवणूक व सत्यजित कोसंबी यांचा गीतांचा कार्यक्रम होणार आहे, असे सुरेश कसबे यांनी सांगितले. 

गंगानगर-प्राधिकरणातील तक्षशीला बुद्ध विहारात सकाळी साडेनऊ वाजता वंदना व पूजा होईल. सायंकाळी रमेश वाकनीस, नागेश जोशी, चंद्रशेखर जोशी, उज्ज्वला केळकर ‘आदि मंगल, मध्य मंगल’ विषयावर नाटिका सादर करणार आहेत, अशी माहिती प्रताप सोनवणे यांनी दिली.