तनिष्कांच्या प्रचारासाठी महिलांनी बांधली मूठ

तनिष्कांच्या प्रचारासाठी महिलांनी बांधली मूठ

पुणे - ‘‘तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकांमधून महिलांमधील नेतृत्वगुणाला चालना मिळणार आहे. त्याशिवाय महिलांच्या हाती नेतृत्व आले, तर ती काय बदल करू शकते, हेही जगासमोर येऊ शकेल. एक नवे व्यासपीठ, नवा आत्मविश्‍वास आणि नवे क्षितिज देणाऱ्या या निवडणुकांना आमचा पाठिंबा असून, अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन तनिष्कांना मतदान करावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,’’ अशी ग्वाही ‘के अँड क्‍यू’ या ग्रुपच्या महिला सदस्यांनी सोमवारी दिली.

‘तनिष्का व्यासपीठा’च्या नेतृत्वविकास कार्यक्रमांतर्गत १५ आणि १६ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये ग्रुपच्या महिला सदस्या मतदान करणार आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या ग्रुपच्या वतीने महिलांनी तनिष्का उमेदवारांना मतदान करण्यासाठी पुढे यावे, यासाठी मोहीम राबविली जाणार आहे.    निवडणुकांच्या प्रचाराला सोमवारी सुरवात झाली. त्यासाठी ‘सकाळ’ कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणुकीबद्दलची माहिती देण्यात आली. बैठकीस मोनिका राठी, प्रेरणा धूत, डॉ. पूनम मंत्री, वैशाली कारवा, नेहा लद्दड, सोनाली चांडक, सुरेखा मनधने, राखी मुछाल, संगीता राठी, स्वप्ना मुंदडा, श्रद्धा झवर, कविता मालपाणी, शिल्पा राठी, अर्चना चांडक आणि डॉ. शिल्पा लाठी या सदस्या सहभागी झाल्या. 

या निवडणुकांमधून तनिष्कांच्या नेतृत्वगुणाला चालना मिळणार आहे. महिलांचे प्रश्‍न सरकारपुढे मांडण्यासाठी नेतृत्वाची एक फळी यातून निर्माण होईल. समाजात भेडसावणाऱ्या प्रश्‍नांसाठी त्या काम करतील.
- मोनिका राठी

महिलांचे अनेक प्रश्‍न आहेत, जे समाजासमोर येत नाहीत. या निवडणुकांमधून निवडून आलेली तनिष्का महिलांचे हेच प्रश्‍न सरकारी पातळीवर मांडू शकेल. तसेच, महिलांमध्ये आम्ही काही तरी करू शकतो आणि आम्ही जग बदलू शकतो, हा आत्मविश्‍वास त्यांच्यात नक्कीच निर्माण होईल.  
- राखी मुछाल

नव्या कल्पनांसह नव्या क्षितिजाचा शोध महिला घेऊ शकतील. समाजाला त्यांच्या कल्पनांचा आणि विचारांचा फायदा होऊ शकेल. अधिकाधिक महिलांना यामुळे सत्तेत स्थान मिळेल. त्यामुळे महिला समाजाला घेऊन पुढे जाऊ शकतील. त्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत अभिनव आहे. 
- सोनाली चांडक

महिलांनी स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने ‘सकाळ’ने उचलले हे पाऊल वाखाणण्याजोगे आहे. तनिष्का सदस्यांची या निवडणुकांमधून एक महिला म्हणून तिची स्वतःची नवी ओळख निर्माण होऊ शकेल.  
- डॉ. पूनम मंत्री

आधी समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जायचे. पण, आज परिस्थिती बदलली आहे. महिला सर्व प्रकारची जबाबदारी खंबीरपणे पेलत आहेत. निवडणुका हे त्या पुढेचे पाऊल आहे.
- नेहा लद्दड

मुख्याध्यापकांचा मतदानाचा निर्धार

समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी काम करणाऱ्या तनिष्कांना आम्ही मतदान करणार आणि स्त्रीशक्तीला अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावणार, असा निर्धार आज शहरातील मुख्याध्यापकांनी केला.  

नवरात्राच्या तिसऱ्या माळेला शहरातील जवळपास पाचशे शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी ‘तनिष्का’ निवडणुकीचा कार्यक्रम शेकडो पालकांपर्यंत पोचविण्याचा संकल्प केला आहे. यातील बहुसंख्य मुख्याध्यापकांनी सोमवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देऊन ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या निवडणुकांना पाठिंबा दर्शविला. 

‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठांतर्गत १५ आणि १६ ऑक्‍टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्याध्यापक महासंघाची बैठक ‘सकाळ’ कार्यालयात झाली. शहराच्या विविध शाळांमधील मुख्याध्यापक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निवडणुकांच्या माध्यमातून महिलांमधील नेतृत्वगुणाला चालना मिळणार असून, खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल पडले आहे. महिलांचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न आहे, असे समाधान मुख्याध्यापकांनी या वेळी व्यक्त केले. शहरामध्ये जवळपास पाचशेहून अधिक खासगी, निमसरकारी, सरकारी शाळा असून सुमारे ६५ टक्के शाळांमध्ये महिला मुख्याध्यापक आहेत, तर प्रत्येक शाळेत शिक्षिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या माध्यमातून घराघरांत पोचण्याचा प्रयत्न ‘तनिष्का’ व्यासपीठातर्फे केला जात आहे. 

‘‘अकरावी आणि बारावीच्या मुलींनाही समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या माध्यमातून या प्रकारची कार्यशाळा घ्यावी,’’ असे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड यांनी सुचविले. बिबवेवाडी येथील रामराज्य माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कामथे म्हणाले, ‘‘महिला पालकांपर्यंत पोचून जागृती करण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षक, शिक्षिका सहकार्य करतील.’’

शिक्षिका, पालकांनाही सहभागी करू
तिलोत्तमा रेड्डी, ट्रिझा डेव्हिड, सुजाता नायडू, कामिनी जव्हेरी, नीलिमा कोपर्डे, सुलभा शिंदे, लीना तलाठी, कल्पना वाघ, स्मिता कुलकर्णी, आभा तेलंग, हेमा बर्डे, अविनाश ताकवले, अविनाश जाधव, रामदास भुजबळ, विठ्ठल शिंदे, चंद्रकांत मोहोळ, सुजित जगताप बैठकीला उपस्थित होते. महिला मुख्याध्यापकांनी ‘सकाळ’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. ‘‘शहराच्या सर्व शाळांतील महिला मुख्याध्यापक, महिला शिक्षिका, विद्यार्थ्यांचे पालक यांनाही तनिष्कांना मतदान करण्यासाठी आवाहन करू; तसेच शहरातील विविध मतदान केंद्रांवर जाऊन तनिष्कांना मतदान करण्यास प्रवृत्त करू,’’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com