झुकझुक झुकझुक मुलांची गाडी...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत आजी-आजोबा, आई-बाबा यांच्यासमवेत उद्यानात फिरायला जाण्याची मजा काही औरच असते आणि उद्यानात ‘फुलराणी’ सारखी छोटी ट्रेन असेल, तर मग धम्मालच ना!

‘फुलराणी’बरोबरच बच्चे कंपनी आता मेट्रो नव्हे, चक्क ‘बुलेट ट्रेन’मध्ये बसण्याचा आनंद लुटत आहेत. शहरात विविध ठिकाणी अशा ‘ट्रेन’ची सफर मुले अनुभवत आहेत.

पेशवे उद्यानात अनेक दशकांपासून ‘फुलराणी’ बच्चे कंपनीला आनंद देत आहे. याचधर्तीवर शहरातील विविध उद्यानांमध्ये छोट्या झुकझुकगाड्या धावत आहेत. यातील काही रुळावर, तर काही रस्त्यांवरही धावत आहेत. महापालिकेच्या पेशवे उद्यानात ८ एप्रिल १९५६ मध्ये ‘फुलराणी’चे उद्‌घाटन झाले. ही ‘फुलराणी’ सुरवातीला डिझेलवर होती, त्यानंतर १ मे २००५ मध्ये तिचे नूतनीकरण करण्यात आले. आता ही गाडी सौरऊर्जेवरील बॅटरीच्या साहाय्याने धावत आहे. यानंतर कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाजवळ मुलांसाठी छोटी रेल्वे सुरू झाली. यानंतर अण्णा हजारे उद्यान आणि भैरवनाथ उद्यानात रेल्वे ट्रॅक नसणारी गाडी सुरू झाली.

गेल्या काही वर्षांपासून घोरपडे पेठेतील श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यानात ‘झुकझुक’ गाडी सुरू आहे. तर जानेवारी २०१७ मध्ये वडगाव शेरीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छोटेखानी ‘बुलेट ट्रेन’ सुरू करण्यात आली. 

वडगाव शेरीतील उद्यानात असणाऱ्या ‘बुलेट ट्रेन’ला उन्हाळ्याच्या सुटीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. संध्याकाळी सुरू असणाऱ्या या ‘ट्रेन’चा लाभ दरदिवशी पाचशे मुले घेतात. याशिवाय पेशवे उद्यान आणि पेशवे जलाशय येथील ‘फुलराणी’मधून जवळपास दरवर्षी १५ ते १६ लाख रुपयांचा निधी जमा होतो. शहरातील या सर्व प्रकारच्या ‘ट्रेन’ला वर्षभरच गर्दी असते. मात्र सुट्ट्यांच्या दिवसांत या गर्दीत वाढ होते.
- संतोषकुमार कांबळे, उद्यान अधीक्षक