"बैलगाडा मालकांचा खरा शत्रू "पेटा'च; पेटाविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन

उत्तम कुटे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

"2008 सालापासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र, 2014 पर्यंत कोणत्याही सरकारने त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली नाही. तसेच, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने स्वखर्चाने न्यायालयात बाजू मांडण्याची भूमिका घेतली नाही. मात्र, भाजपने ही बंदी उठविण्याबाबत कायदा तयार केला. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून खुद्द मुख्यमंत्री सकारात्मक आहेत

पिंपरीः ज्या संस्थेमुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाची बंदी
आली,त्या "पेटा'विरोधातच आता बैलगाडामालक व शौकिनांनी राज्यव्यापी आंदोलन
करण्याचे ठरविले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या
या शर्यतीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, "पेटा'मुळे ती सुरू होत
नसल्याने अखिल भारतीय बैलगाडामालक व चालक कृती समितीने आज येथे बैठक घेऊन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी
राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका नुकतेच करणारे शिवसेनेचे खासदार
शिवाजीराव आढळराव- पाटील यांचे नाव न घेता त्यांचा समाचार यावेळी घेण्यात
आला.

भारतीय जनता पक्षाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली
समितीने पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू
करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी या शर्यतीला "पेटा'च खोडा
असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या संस्थेलाच उपस्थित सर्वांनी लक्ष्य
केले. मोठ्या संख्येने गाडामालक व शौकीन यावेळी उपस्थित होते. आढळराव हे
यासंदर्भात सरकारविरुद्ध अप्रचार करीत असल्याचे त्यांचे नाव न घेत लांडगे
म्हणाले.तसेच या प्रश्‍नावरून मी कधीही श्रेयाचे राजकारण केले नसून
पुढेही करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारची बाजूच त्यांनी
मांडली.

आमदार लांडगे म्हणाले,""2008 सालापासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी
उठविण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र, 2014 पर्यंत कोणत्याही सरकारने
त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली नाही. तसेच, कोणत्याही पक्षाच्या
नेत्याने स्वखर्चाने न्यायालयात बाजू मांडण्याची भूमिका घेतली नाही.
मात्र, भाजपने ही बंदी उठविण्याबाबत कायदा तयार केला. बैलगाडा शर्यत सुरू
व्हावी म्हणून खुद्द मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. दोन्ही सभागृहातील
सदस्यांनी पाठिंबा देवून संबंधित विधेयक मंजूर केले. न्यायालयीन लढाईसाठी
राज्य सरकारने स्वखर्चातून वकिलांची नेमणूक केली आहे.तरीही काही लोक ही
बंदी उठविण्याबाबत सरकारचे अपयश असल्याचा अपप्रचार करीत आहेत''

श्रेयवादाचे राजकारण नाही
""बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत आजवर जो काही पाठपुरावा केला. त्याबाबत
मी कधीही मीच केले, असे म्हटलेले नाही. आजपर्यंत कोणत्याही व्यासपीठावर
मी बैलगाडा शर्यतीबाबत केलेल्या पाठपुराव्याचे राजकारण केले नाही.
एव्हढेच नव्हे, तर माझ्याशिवाय बैलगाडा शर्यती सुरू होणार नाहीत, असेही
कधी म्हटलेले नाही. मी प्रामाणिकपणे बैलगाडा मालकांसाठी काम करीत आहे.
शपथ घेऊन सांगतो, मला राजकीय फायदा होवो अथवा न होवो मी बैलगाडा
शर्यतीवरून श्रेयवादाचे राजकारण केले नाही व पुढेही करणार नाही'', असेही
आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले.