बस प्रवाशांच्या जिवाशी खेळ का?

Batmichya-Palikade
Batmichya-Palikade

सातारा रस्त्याची फेररचना करताना त्यावर उभारण्यात येणाऱ्या बीआरटी मार्गातील त्रुटींमुळे प्रवाशांची केवळ गैरसोय होणार नाही, तर त्यांना असुरक्षिततेचाही सामना करावा लागणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मंडळीही त्याकडे डोळेझाक करीत आहेत. सातारा रस्त्यावर पीएमपीच्या बसचे ३० हून अधिक मार्ग आहेत. ४०-५० हजार प्रवासी दररोज त्यांचा वापर करतात. या रस्त्याभोवती निवासी लोकसंख्याही मोठी आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी पीएमपीशिवाय सध्या तरी समर्थ पर्याय नाही. सातारा रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठीच महापालिकेने या रस्त्याच्या फेररचनेचे काम हाती घेतले आहे. मात्र, ते करताना बीआरटी मार्गाची उपयुक्तता लक्षात घेऊन उपाययोजना व्हायला पाहिजे होत्या. मात्र, महापालिकेने सुशोभीकरणाकडेच अधिक लक्ष दिल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर पथदर्शी बीआरटी प्रकल्प २००६ मध्ये कार्यान्वित झाला. तेव्हाची बीआरटी आणि सध्याच्या बीआरटीत फरक आहे.

कात्रज-स्वारगेटदरम्यान सुमारे सहा किलोमीटर अंतराच्या बीआरटीसाठी यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत, अन्‌ सध्याही होत आहेत. यापूर्वी बीआरटीचे बसथांबे हे चौकाजवळ होते. त्यामुळे चौकातून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडून बसथांब्यांपर्यंत पोचणे शक्‍य होते. सध्याचे बसथांबे चौकांपासून दूर आहेत. हे थांबे निश्‍चित करतानाही बसथांबे चौकाजवळ हवेत, असा आग्रह काही जणांनी धरला होता; परंतु महापालिकेतील केबिनमध्ये बसून आराखडे मंजूर करणाऱ्या प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे थांबे चौकांपासून दूर गेले आहेत. त्यामुळे प्रवासी तिथपर्यंत पोचणार कसे?

त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्ग बांधू, असे महापालिका सांगत असली तरी, पादचारी सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकतील का?, याबद्दलही शंका आहेच. रस्ता ओलांडणाऱ्या ठिकाणी पादचारी सिग्नल बसवू, असे सांगितले जात असले तरी, त्याची नेमकी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचे महापालिका काय करणार? कोट्यवधी रुपये खर्च होताना पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांकडे लक्ष देणे गरजेचे असताना नक्षीदार बॉक्‍स टाइप लोखंडी बॅरिकेडसवर उधळपट्टी होताना दिसत आहे. त्यामुुळे रस्ताही वाहतुकीसाठी अपुरा ठरणार आहे. 

महापालिकेचे अधिकारी सल्लागारावर अवलंबून राहत असल्यामुळे त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे. त्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी बीआरटी हा चांगला उपाय आहे, याबद्दल दुमत नाही. परंतु, शास्त्रोक्त पद्धतीने आणि स्थानिक गरजेनुसार उपाययोजना का केल्या जात नाहीत? नागरिकांना जे दिसते आणि समजते ते स्थानिक लोकप्रतिनिधींना का कळत नाही? बीआरटीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे पदाधिकारी वारंवार देतात; परंतु सुरक्षिततेबाबत काय करणार, याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत. दोन बीआरटी मार्गांवर मोफत प्रवासाचे आश्‍वासन देणाऱ्या सत्ताधारी भाजपचे पदाधिकारीही याबाबत मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे प्रवाशांना होत असलेल्या आणि भविष्यात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या संकटांबाबत कोण उपाययोजना करणार? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com