बससेवा अधिक सक्षम करणार 

बससेवा अधिक सक्षम करणार 

पुणे - पुणेकरांच्या पायाभूत गरजांचा विचार करून कॉंग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीसाठी 21 कलमी वचननामा गुरुवारी प्रकाशित केला. त्यात झोपडपट्टी निर्मूलनासाठी "एसआरए'अंतर्गत 500 चौरस फुटांची घरे मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे नमूद करून, वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बससेवा अधिक सक्षम करणार असल्याचे वचन पुन्हा एकदा देण्यात आले आहे. 

राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, उपमहापौर मुकारी अलगुडे, अभय छाजेड, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, गोपाळ तिवारी, आबा बागूल आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ""पुण्यातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून हा वचननामा तयार करण्यात आला आहे. नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणारा हा वचननामा आहे. पुण्याचा विकास हा कॉंग्रेसनेच केला आहे, त्यामुळे शहराच्या भविष्याचा विचार करून हा वचननामा तयार करण्यात आला आहे. यात फक्त समस्या आणि उपाय दिलेले नाहीत, तर त्यात महापालिकेच्या उत्पन्नवाढीचे स्रोतही नमूद केले आहेत.'' 

चोवीस तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था महापालिकेच्या खर्चाने शहरात उभारण्यात येईल. जलवाहिन्यांची संपूर्ण कामे आगामी काळात तातडीने पूर्ण केली जातील. तसेच, कचऱ्यापासून खते, विटा तयार करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील एका वर्षात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा सक्रिय केली जाईल. 

वाहतूक हा शहरापुढील ज्वलंत प्रश्‍न आहे, त्यावर या वचननाम्यात भर देण्यात आला आहे. कॉंग्रेस पक्षाने सुरू केलेल्या मेट्रोच्या कामाला गती देऊन लवकर पूर्ण करणार असल्याचे यात ठळकपणे नमूद केले आहे. सायकल स्टेशन आणि सायकल मार्ग हा एक पर्याय या वचननाम्यात पुणेकरांना कॉंग्रेसने दिला आहे. 

रस्तेविकास, पर्यटनविकासापासून ते निर्मळ मुळा-मुठा, क्रीडा, पर्यावरणसंवर्धन, आठवडे बाजार, आपत्ती व्यवस्थापनपर्यंत वेगवेगळ्या 21 कार्यक्रमांचा या वचननाम्यात समावेश आहे. 

उत्पन्नवाढीचे स्रोत 
- शंभर टक्के थकबाकी वसुली 
- महापालिकेच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर पॅनेल व एलईडी लावून वीजबचत 
- महापालिकेचे मोकळे आणि ऍमेनिटी प्लॉट विकसित करून भाडेतत्त्वावर देणार 

वचननाम्यातील ठळक मुद्दे 
- पेठ भागातील महापालिकेच्या राखीव जागांवर बहुमजली पार्किंग उभारणार 
- खासगी जागामालकांना मोबदला देऊन यांत्रिक पार्किंग उभारणार 
- नवीन सांस्कृतिक विभाग सुरू करणार 
- लोकप्रसिद्धीसाठी "ब्रॅंड ऍम्बेसीडर'ची नियुक्ती करणार 
- संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्राखाली आणणार 
- जुन्या तालीम पुनरुज्जीवित करण्यासाठी विशेष निधी देणार 
- आठवडे बाजारसाठी जागा उपलब्ध करणार 

मते आकर्षित करण्यासाठी व्यूहरचना 
कॉंग्रेसने प्रचाराचा प्रारंभ उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शपथ देऊन करण्यात आला. तर, प्रचाराचा नारळ समता भूमी येथे झालेल्या कार्यक्रमात फोडण्यात आला. त्यानंतर वचननाम्याचे प्रकाशन कॉंग्रेस भवन येथे लाल महालाची प्रतिकृती साकारून त्या समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. दलित, इतर मागासवर्गीय आणि मराठ्यांची मते आकर्षित करण्यासाठी ही व्यूहरचना केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. 

कोणत्याही पक्षाची "कॉपी' नाही 
आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची परंपरा होती. या निवडणुकीपूर्वी जाहीरनामा हा शब्द बदलून "वचननामा' वापरला आहे. याबाबत कोणत्याही पक्षाची "कॉपी' केली नसून, हा पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय आहे, असेही कॉंग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com