‘इमेज प्रोसेसिंग’द्वारे व्यवसाय व्यवस्थापन

सलील उरुणकर  
शनिवार, 18 मार्च 2017

बांधकाम क्षेत्र, हॉटेल बुकिंग आणि रेस्टॉरंट टेबल बुकिंग या क्षेत्रामध्ये ‘इमेज प्रोसेसिंग’ तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसाय व्यवस्थापनाची सुविधा ‘विलानी टेक्‍नॉलॉजी’ या ‘बी टू बी’ स्टार्ट अपने दिली आहे. लघू व मध्यम उद्योजकांसाठी ही संगणकप्रणाली अत्यंत उपयुक्त असल्याचे स्टार्ट अपचे संस्थापक अमोल चौधरी यांचे मत आहे. 

रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये असलेल्या छोट्या यंत्रावरून आपली खाद्यपदार्थांची ऑर्डर घेतली जाते, हे आपण पाहिले असेल. मात्र, अशी खास यंत्र विकत घेण्यासाठी प्रत्येक हॉटेल मालकाकडे पुरेसा निधी असेलच, असे नाही. या खास यंत्रामार्फत केले जाणारे काम मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे झाल्यास व्यावसायिकाचीही सोय होऊ शकते. बाजारातील ही मागणी ओळखून अमोल चौधरी व त्याच्या टीमने लघू व मध्यम उद्योजकांसाठी ‘इमेज प्रोसेसिंग’ तंत्रज्ञानाच्या आधारे सुविधा निर्माण करून दिली आहे. 

‘विलानी मार्ट डॉट कॉम’ नावाने अमोल व त्यांचे सहकारी प्रमोद चौधरी, प्रियांका चौधरी आणि पूजा कंद यांनी काम सुरू केले. पीआयसीटी महाविद्यालयातून एमई कॉम्प्युटर शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमोल यांनी दक्षिण आफ्रिकेसह अनेक ठिकाणी काम केले. दहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर त्यांनी स्टार्ट अप सुरू केले. सॉफ्टवेअर डिझाईन, धोरणात्मक निर्णय, गुंतवणूक मिळवण्याचे काम अमोल करतात, तर प्रियांका या टेस्टिंग आणि कस्टमर सपोर्टचे काम बघतात. पूजा यांच्याकडे क्‍लाउड व अँड्रॉईड डेव्हलपमेंटचे काम आहे. ही सॉफ्टवेअर सुविधा सुरवातीच्या काळात बांधकाम क्षेत्रासाठी देण्यात आली होती, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या मंदीसदृश्‍य परिस्थितीमुळे अमोल व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेस्टॉरंट व हॉटेल रूम बुकिंग क्षेत्रामध्ये व्यवसाय विस्तार केला. 

अमोल म्हणाले, ‘‘कोणत्याही बांधकाम प्रकल्पाचे नकाशे आणि तपशील बघण्यासाठी सुरवातीला ही संगणकप्रणाली विकसित करण्यात आली. त्यासाठी इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ‘कलर कोड’च्या आधारे प्रत्येक मजल्यावरची ‘ऑक्‍युपन्सी’ बघण्याची सुविधा आमच्या उत्पादनात आहे. सध्या रेस्टॉरंट टेबल बुकिंगची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. ग्राहकांकडून ‘ऑर्डर’ घेण्यासाठी कोणत्याही खास आणि वेगळ्या यंत्राची गरज न ठेवता साध्या स्मार्ट फोनवरून ते काम करण्याची सोपी पद्धत आम्ही व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये सुद्धा रेस्टॉरंटमधील टेबलचा संपूर्ण लेआउट मोबाईलवर दिसतो आणि कर्मचाऱ्यांकडून प्रतिमेच्या आधारे ‘ऑर्डर’ घेतली जाते. या सुविधेमुळे व्यावसायिकांचा ‘इन्फ्रास्ट्रक्‍चर’वरील खर्च कमी होतो. या व्यतिरिक्त इ-पेमेंट, ग्राहक संबंध व्यवस्थापनाच्या सुविधाही व्यावसायिकांना उपलब्ध आहेत.’’

‘‘हे स्टार्ट अप ‘बी टू बी’ असल्यामुळे आमच्याकडे १८ ग्राहक आहेत. आम्ही आतापर्यंत तीन हजार इनव्हॉइस आणि पाच हजार प्रॉपर्टी सांभाळत आहोत. पुढील काळामध्ये बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. येत्या काही दिवसांत दोन कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक मिळविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,’’ असेही अमोल यांनी सांगितले.

Web Title: Business management by image processing