कॅबचालकाकडून तरुणीला मारहाण

Crime
Crime

पुणे - नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा आल्याचा जाब तरुणीने उबर कॅबच्या चालकास विचारला. त्याचा राग आल्याने त्याने तरुणीला अश्‍लील भाषेत शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार शनिवारवाडा परिसरात शनिवारी घडला. दरम्यान, पळून गेलेल्या कॅबचालकास पोलिसांनी एका तासात ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका वीसवर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कॅबचालक विनोद राजाभाऊ गायकवाड (वय ३१, रा. इंगळे कॉर्नर, पार्वती क्‍लासिक, उत्तमनगर) यास अटक केली.  शनिवारवाडा परिसरात राहणाऱ्या नातेवाइकांकडे संबंधित तरुणी गेली होती. तेथून घरी परत येण्यासाठी तिने दुपारी तीन वाजता उबर कंपनीच्या कॅबची ऑनलाइन नोंदणी केली; परंतु कॅब अर्धा तास उशिरा आली. गाडीमध्ये बसल्यानंतर तरुणीने चालकाला उशिरा येण्याचा जाब विचारला. त्यावरून चालकाने गाडी थांबवून तरुणीशी अश्‍लील भाषेत बोलण्यास सुरवात केली. तिच्या नातेवाइकांनीही चालकाला व्यवस्थित बोलण्यास सांगितले. त्या वेळी त्याने दोघांना गाडीतून बाहेर काढले; तसेच तरुणीच्या हाताला धरून तिलाही गाडीच्या बाहेर ओढले. त्यानंतर तरुणीला अश्‍लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने एका तासात कॅबचालकाचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. 

दोघांना विमानतळावर अटक 
बनावट टुरिस्ट व्हिसा बनवून अबुधाबी येथे नोकरीसाठी जाणाऱ्या दोन तरुणांना विमानतळ पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. दोघांनीही एम्प्लॉयमेंट व्हिसा व टुरिस्ट व्हिसा या दोन्ही व्हिसांवर एकच क्रमांक टाकल्याने दोघे पोलिसांच्या जाळ्यात सहज अडकले.

या प्रकरणी विमानतळाच्या इमिग्रेशन विभागाचे सिक्‍युरिटी असिस्टंट राहुल सौंदाळकर (वय ३२, रा. लोहगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोमनपल्ली दुर्गा पवन (वय २७) व सुन्कारा लक्ष्मी नारायण (वय २३, दोघेही रा.  आंध्र प्रदेश) या दोघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप जयसिंगकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे अडीच वाजता कोमनपल्ली व सुन्कारा हे दोघे अबुधाबी येथे नोकरीसाठी जात होते. त्यावेळी दोघांना बनावट कागदपत्रे बनविल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com