प्रचाराचा मजकूर लिहिणाऱ्यांची "चांदी' 

content-writer
content-writer

पुणे - "सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर, आपला लाडका नगरसेवक', "नगरसेवक नाही जनसेवक' आणि "आता लक्ष्य 2017' असे वेगवेगळे संदेश सध्या उमेदवारांच्या फेसबुक पेज आणि व्हॉट्‌सऍपवर झळकत आहेत. उमेदवारांना हे संदेश आणि मजकूर लिहून देणाऱ्या कंटेंट रायटरची मागणी वाढली असून, त्यामुळे कंटेंट रायटरची "चांदी'च होत आहे. 

उमेदवाराच्या फेसबुक पेज आणि वैयक्तिक संकेतस्थळावरील अपडेटसह त्यांचे दररोजचे ब्लॉग आणि प्रचार मोहिमेतील मजकूर हे रायटर लिहून देत आहेत. त्यासाठी या रायटरला हजारो रुपये मिळत आहेत. प्रचार रॅलीपासून ते सोशल मीडियावर घोषवाक्‍य टाकण्यापर्यंतचा सगळा मजकूर तयार केला जात आहे. 

सोशल मीडियासह प्रचार रॅलीमध्ये खास प्रकारच्या संदेशांमधून उमेदवार मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. हाच लक्षवेधी मजकूर तयार करण्यासाठी रायटर गेल्या महिन्यापासून तयारीला लागले होते. प्रचारातील प्रत्येक सेंकदाचे अपडेट ते वेगळ्या शैलीत लिहून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. या कामासाठी अशा रायटरला 7 ते 15 हजार रुपये दिले जात आहेत. तर एजन्सीद्वारे दोन ते तीन उमेदवारांसाठीचे लेखन करणाऱ्या रायटरची कमाई पन्नास हजार रुपयांच्याही पुढे जात आहे. 

याबाबत निरंजन वैद्य म्हणाले, ""गेल्या एक महिन्यापासून आम्ही काम करत आहोत. उमेदवारांचा कार्य अहवालही तयार करून दिला जातो. घोषवाक्‍यांसह त्यांच्या प्रचारातील क्षणोक्षणीचे अपडेट त्यांना लिहून द्यावे लागतात. बऱ्याच उमेदवारांचा वेगळ्या घोषवाक्‍यांवर भर असून, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. एजन्सीसाठीही काही रायटर काम करत आहेत. तर काही जणांनी वैयक्तिकरीत्या ही कामे स्वीकारली आहेत. या कामासाठी त्यांना 15 ते 50 हजार रुपये दिले जात आहेत. येत्या दहा दिवसांत त्यांची आणखी मागणी वाढेल असे वाटते.'' 

सोशल मीडियावर आगळेवेगळे संदेश 
वेगळ्या धाटणीचा मजकूर सोशल मीडियावर टाकण्यासाठी रायटर रात्रंदिवस काम करत आहेत. तसेच त्याचे क्षणोक्षणीचे अपडेट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दररोजचा ब्लॉग, इंस्टाग्रामवरील छायाचित्रे, व्हॉट्‌सऍप ग्रुपमधील मजकूर लिहून देण्याचे काम रायटर करत आहेत. सगळ्यांपेक्षा वेगळा आणि मतदारांना भावणारा मजकूर मिळावा, असा आग्रह उमेदवारांकडून होत आहे. 

कार्यअहवालामुळे रायटरची "चांदी' 
उमेदवाराने आतापर्यंत केलेल्या कामाचा कार्यअहवाल तयार करण्याचे कामही अनेक कंटेंट रायटर करून देत आहेत. कार्यअहवाल आकर्षक आणि मजकूर मतदारांच्या मनाला भिडणारा हवा, यासाठी उमेदवार आग्रही असून त्यासाठी ते अधिक पैसे द्यायलाही तयार आहेत. त्यामुळे कंटेंट रायटरची "चांदी'च होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com