निवडणूक लढवली अन्‌ बरबादी ओढवली

निवडणूक लढवली अन्‌ बरबादी ओढवली

चिखली - महापालिका निवडणूक लढवून असे काय मिळणार होते, काही उमेदवारांनी घरदार विकून सर्वस्व पणाला लावले. मात्र, निवडणूक हरल्याने पदरी निराशा आली. निवडणुकीत सर्वस्व गमावल्याने काहींवर आता आठ- दहा हजार रुपये पगारावर काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निवडणूक लढवली आणि बरबादी ओढवली, असे म्हणण्याची वेळ काही जणांवर आली आहे. विशेषतः काही कुटुंबांचे अन्नदाता असलेल्या या व्यक्तीवर आता कामगार होण्याची वेळ आली आहे. 

निवडणूक म्हटले, की लाखो रुपयांची उधळपट्टी ठरलेली, हे गृहीतच धरले जाते. गुंठामंत्री किंवा मोठ्या व्यावसायिकांकडे हा खर्च पेलण्याची ताकद असते; परंतु एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असेल, तर हा खर्च पेलवणे त्यांना शक्‍य नसते. त्यामुळे सर्वसामान्य उमेदवारांना निवडणूक लढविताना आपले सर्वस्व पणाला लावावे लागते; परंतु निवडणुकीत अपयश आल्यावर त्यांची ‘ना घरका ना घाटका’ अशी स्थिती होते. महापालिका निवडणूक लढविणाऱ्या भोसरी विधानसभा मतदा संघातील दोन उमेदवारांबाबत असाच प्रकार घडला आहे. 

घर अन्‌ वाहनही विकले
एका अपक्ष उमेदवाराने स्वतःचा व्यवसाय व जागा पन्नास लाखाला विकली. निवडणुकीत पैसा कमी पडला म्हणून स्वतःचे राहते घर गहाण ठेवले. त्यानंतर जवळचे चारचाकी वाहनही विकले. निवडणूक प्रचारादरम्यान सर्व पैशाची उधळपट्टी केली. एवढे करूनही हा उमेदवार पराभूत झाल्याने त्याच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे आता या उमेदवारावर दुसऱ्याकडे कामाला जाण्याची वेळ आली आहे. 

मालक झाला नोकर
असाच काहीसा प्रकार भोसरीतील एका उमेदवाराबाबतही घडला आहे. त्याला एका राजकीय पक्षाचे तिकीटही मिळाले होते. या व्यक्तीचा छोटासा व्यवसाय होता. चाकण येथील एका कंपनीला तो कच्चा माल पुरवीत होता. आठ- दहा कुटुंबांचा तो अन्नदाता होता; परंतु निवडणुकीसाठी पैसा उभारताना जागेसह व्यवसाय विकला. निवडणुकीत पराभव झाला. मालक असलेली हीच व्यक्ती आता कामगार झाली असून, चाकणच्या एका कंपनीत कामगार म्हणून काम करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com