रिपब्लिकन पक्षाकडून प्रशिक्षित उमेदवारांची फौज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

पुणे - इच्छुकांच्या मुलाखतीचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) आता इच्छुकांचे प्रशिक्षण शिबिर घेण्याचे ठरविले आहे. ज्या ठिकाणी हमखास निवडणूक लढविण्यात येणार आहे, त्या प्रभागात कार्यकर्त्यांच्या बैठकांवर भर दिला असून, दुसरीकडे जागा वाटपासंदर्भात योग्य मार्ग निघावा, यासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर बोलणी सुरू ठेवली आहेत.

पुणे - इच्छुकांच्या मुलाखतीचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) आता इच्छुकांचे प्रशिक्षण शिबिर घेण्याचे ठरविले आहे. ज्या ठिकाणी हमखास निवडणूक लढविण्यात येणार आहे, त्या प्रभागात कार्यकर्त्यांच्या बैठकांवर भर दिला असून, दुसरीकडे जागा वाटपासंदर्भात योग्य मार्ग निघावा, यासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर बोलणी सुरू ठेवली आहेत.

1997 नंतर पक्षाच्या कामगिरीला लागलेली उतरती कळा थांबविण्यासाठी यंदाच्या महापालिका निवडणुकीत पक्षाने पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसोबत लोकसभा-विधानसभेनंतर महापालिकेतही युती करण्याचा निर्णय पक्षाने जवळ-जवळ घेतला असून, जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी आता व्यूहरचना आखण्यात आली आहे. झोपडपट्टी परिसरातील मतदारांवर अधिकाधिक भिस्त असल्याने या पक्षाने सर्वधर्मीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्याचेच प्रतिबिंब पक्षाने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी दिसून आले. उच्चशिक्षित व सर्वधर्मांमधील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस आवर्जून हजेरी लावली होती.

पक्षाच्या मुलाखतीस 65 जणांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उपस्थिती लावली. या उमेदवारांना त्यांच्या प्रभागातील महत्त्वाची कामे, समस्या, नवीन उपक्रम राबविण्यासाठीच्या संधी, मतदारांची संख्या, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी काय करणे आवश्‍यक आहे, यादृष्टीने आता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व तज्ज्ञांच्या मार्फत हे मार्गदर्शन केले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या प्रत्येक प्रभागांमध्ये दोन निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या-त्या प्रभागांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पक्षाला सादर करण्यात येणार आहे. त्याद्वारे कोणाचे काम सुरू आहे आणि कोणाचे नाही, याची पाहणी होणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

28 जागांसाठी प्रयत्न सुरू
निवडणुकीमध्ये पक्षाला 28 जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केला जात आहे. याबाबत भाजपसोबत चर्चा करण्यासाठी येत्या आठवड्यात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये पक्षाच्या शहरातील सर्व शाखांमधील कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणीवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यावरही शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागांमधील विकासकामे गतीने करण्यावर भर दिला आहे. इच्छुकांनी वैयक्तिक प्रचाराचा जोर वाढविला आहे.

Web Title: candidate team in rpi for municipal election