जातीच्या समीकरणांवर ठरणार उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

सुमारे 60 टक्के वस्ती भाग असलेल्या ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल प्रभागात धार्मिक आणि जातीच्या समीकरणांच्या आधारावर उमेदवारांची निवड होईल, अशी चिन्हे आहेत. बौद्ध, मुस्लिम, मातंग, चर्मकार, मेहतर आदी समाजांचे ताडीवाला रस्ता परिसरात प्राबल्य आहे. या भागात मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड- कॉंग्रेसच्या लता राजगुरू यांच्या जुन्या प्रभागातील संपूर्ण भाग या प्रभागात समाविष्ट आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे आणि नगरसेविका लक्ष्मी घोडके यांच्याही जुन्या प्रभागातील बहुतांश भाग या प्रभागात आहे.

सुमारे 60 टक्के वस्ती भाग असलेल्या ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल प्रभागात धार्मिक आणि जातीच्या समीकरणांच्या आधारावर उमेदवारांची निवड होईल, अशी चिन्हे आहेत. बौद्ध, मुस्लिम, मातंग, चर्मकार, मेहतर आदी समाजांचे ताडीवाला रस्ता परिसरात प्राबल्य आहे. या भागात मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड- कॉंग्रेसच्या लता राजगुरू यांच्या जुन्या प्रभागातील संपूर्ण भाग या प्रभागात समाविष्ट आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे आणि नगरसेविका लक्ष्मी घोडके यांच्याही जुन्या प्रभागातील बहुतांश भाग या प्रभागात आहे. लगतच्या दोन प्रभागांतील सुमारे 20 टक्के भाग नव्याने या प्रभागात आला आहे. 

ताडीवाला रस्ता, लडकतवाडी, अग्रवाल कॉलनी, साधू वासवानी चौक, ससून क्वार्टर्स, बरके आळी, सोमवार पेठ आणि भवानी पेठ पोलिस लाइन, सायकल सोसायटी, राजेवाडी, पत्रा चाळ, पद्मजी कंपाउंड आदी भागांचा नव्या प्रभागात समावेश आहे. सुमारे 71 हजार लोकसंख्या असलेल्या या "कॉस्मोपॉलिटन' प्रभागात विविध जाती-धर्मांचे प्राबल्य असून, वस्ती भाग, बैठी घरे आणि सोसायट्यांचाही समावेश आहे. 

या प्रभागात सध्या कॉंग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे. कॉंग्रेसचे प्राबल्य आहे, असे वाटत असले, तरी मधल्या काळातील काही घडामोडींमुळे परिस्थिती बदलली आहे. भाजपकडेही इच्छुकांची संख्या वाढली असून, शिवसेना, मनसेही आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड याच प्रभागात राहतात. त्यांचा मुलगा मयूर इच्छुकांच्या रिंगणात उतरला आहे. त्याशिवाय माजी आमदार कमल ढोले-पाटील यांच्या कुटुंबातूनही उमेदवार येईल, अशी येथे चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडेही इच्छुकांची संख्या वाढली आहे. या प्रभागात रिपब्लिकन पक्षाला मानणारा मतदारही मोठ्या संख्येने आहे. त्याशिवाय भारिप-बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष यांचेही मतदार आहेत. त्यांचेही उमेदवार असतील. बौद्ध समाजातील मतदारही मोठ्या संख्येने असून, त्यांच्या एकत्रीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. काही अपक्षही इच्छुक असून, अनपेक्षित पक्षांतरही होऊ शकते, असे  परिसरातील कार्यकर्ते सांगत आहेत, तर पुणे स्टेशन, ससून क्वार्टर्स, सायकल सोसायटी परिसरातूनही उमेदवार येऊ शकतात. या भागात पोलिसांच्या भवानी  पेठ आणि सोमवार पेठ या दोन वसाहती आहेत. मुस्लिम मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे उमेदवार ठरविताना राजकीय पक्षांना या दोन घटकांचाही प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे. 

- कॉंग्रेस ः अरविंद शिंदे, लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, रजनी त्रिभुवन, नुरुद्दिन सोमजी, सुजित यादव, हाजी नदाफ, चॉंदबी नदाफ, राहुल तायडे, जयंत किराड 

- भाजप ः दिनेश नायकू, जितेंद्र जगताप, जयप्रकाश पुरोहित, अमित बरके, किरण कांबळे, गणेश अवघडे, श्रीराम चौधरी, स्वाती धनगर, राधेश्‍याम शर्मा, सुरेश माने, माया नायकू, अमित चव्हाण 

- राष्ट्रवादी कॉंग्रेस ः मयूर गायकवाड, प्रदीप गायकवाड, मायकेल साठे, उद्धव बडदे, नितीन रोकडे, अर्जुन आदमाने, संगीता बराटे, प्रतिमा तांबे, पूजा वाघमारे, मनीषा भोईटे, अलका साठे, सुवर्णा माने, संजय जाधव, फईम शेख, बाळासाहेब बरके, सुरेखा शिवरकर 

- शिवसेना ः संतोष सोनावणे, अभय वाघमारे, डॉ. अमोल देवळेकर, मनोज गव्हाणे 

- मनसे ः अनिल बेंगळे, उषा पवार, असिफ सय्यद, बाळू पवार, गजेंद्र परदेशी 

- रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) ः शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, सोनू निकाळजे, विशाल शेवाळे, जितेंद्र गायकवाड 

- भारिप बहुजन महासंघ- गजेंद्र कांबळे, रिपब्लिकन सेना - सचिन शिंदे, बहुजन समाज पार्टी - सुमन गायकवाड, 

- भीम छावा संघटना - श्‍याम गायकवाड, नीलम गायकवाड, अन्य ः रज्जाक खान