कॅंटोन्मेंटमधील नागरी क्षेत्र महापालिकेत आणणार - बापट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - 'लष्कराची सुरक्षितता तर महत्त्वाची आहे, त्याचबरोबर कॅंटोन्मेंटमधील नागरिकांचे प्रश्‍नही सुटले पाहिजेत. त्यासाठी कॅंटोन्मेंटची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. म्हणूनच कॅंटोन्मेंटमधील नागरी क्षेत्र महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणार आहे,'' असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिले.

पुणे - 'लष्कराची सुरक्षितता तर महत्त्वाची आहे, त्याचबरोबर कॅंटोन्मेंटमधील नागरिकांचे प्रश्‍नही सुटले पाहिजेत. त्यासाठी कॅंटोन्मेंटची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. म्हणूनच कॅंटोन्मेंटमधील नागरी क्षेत्र महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणार आहे,'' असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिले.

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्यावतीने सदस्या प्रियांका श्रीगिरी यांच्या वॉर्डातील ताबूत स्ट्रीट येथे नव्याने बसविण्यात आलेल्या "वॉटर एटीएम'चे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, लष्कराच्या मालमत्ता विभागाचे संचालक संजीव कुमार, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, बोर्डाच्या सदस्या डॉ. किरण मंत्री, अतुल गायकवाड, रूपाली बिडकर, विनोद मथुरावाला व संयोजक राजेश श्रीगिरी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ""नागरीकरण वेगाने होत असतानाच कॅंटोन्मेंटमधील नागरिकांना घर दुरुस्त करण्यापासून बांधण्यापर्यंत असंख्य अडचणी येत आहेत. नागरी भागाचा व लष्करी भागाचा संबंध येत नाही. म्हणूनच कॅंटोन्मेंटचे कायदे बदलण्याचीही वेळ आली आहे. कॅंटोन्मेंटची पुनर्रचना करताना नागरी क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असून, याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करणार आहे.'' कॅंटोन्मेंटवासीयांना पाणी कमी पडू देणार नाही; मात्र त्यांनीही पाणी जपून वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. यादव म्हणाले, ""राज्य सरकारकडे असंख्य कल्याणकारी योजना आहेत. परंतु, कॅंटोन्मेंटमधील नागरिक या योजनांपासून वंचित आहेत, त्याचा लाभ कॅंटोन्मेंटवासीयांना मिळावा, यासाठी आम्हीही राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. या प्रश्‍नाकडे बापट यांनीही गांभीर्याने पाहावे.''

कॅंटोन्मेंटवासीयांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा कॅंटोन्मेंटवासीयांनाही लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जावेत.
- ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, अध्यक्ष, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

Web Title: cantonment rural field rolling Municipal Urban Area