दिग्गजांकडून मिळाल्या करिअरच्या टिप्स

दिग्गजांकडून मिळाल्या करिअरच्या टिप्स

पुणे - आयटीतील करिअरच्या संधी कोणत्या... इंजिनिअरिंगमधील प्रवेशप्रक्रियेची माहिती... डिजिटल माध्यमातील करिअरचे पर्याय अन्‌ तणावापासून दूर राहण्यासाठी काय करावे?, अशा प्रश्‍नांची समर्पक उत्तरे मंगळवारी तरुणाईला विविध क्षेत्रांतील दिग्गजांकडून ‘यिन समर यूथ समिट’मध्ये मिळाली. तसेच, ताणतणावापासून दूर कसे राहावे याबाबत महत्त्वपूर्ण टिप्सही मिळाल्या. 

‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजिलेल्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी विविध दिग्गजांची व्याख्याने झाली. त्याला तरुण-तरुणींचा चांगला प्रतिसाद मिळाला. दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘यिन’च्या माध्यमातून या परिषदा होत आहेत. यासाठी ‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले व अभी ग्रुप ऑफ कंपनीज्‌ सहप्रायोजक आहेत.

‘यिन’च्या शंभर तरुणांना इंटर्नशिप देणार - जोशी 
‘‘अडचणींवर मात करायला शिका. काळानुसार बदला आणि टीमवर्ककडे लक्ष द्या. टीमला घेऊन कॉर्पोरेट क्षेत्रात वाटचाल केली, तर नक्कीच यशस्वी व्हाल,’’ असा सल्ला अभी ग्रुप ऑफ कंपनीज्‌चे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र जोशी यांनी तरूणाईला दिला. ते म्हणाले, ‘‘मी दहावीला गणितात नापास झालो. पण, पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण झालो आणि पुढे विविध क्षेत्रांत काम केले. लॉजिस्टिक ॲण्ड सप्लाय चेन सुरू करुन यश मिळाले. त्यानंतर कॉर्पोरेट इव्हेंटपासून हेल्थकेअरपर्यंत सर्व माध्यमांत काम सुरू केले. प्रवास खडतर असेल, तरच तो खरा जीवनप्रवास बनतो. म्हणून काही तरी करण्याची जिद्द बाळगली आणि यशस्वी झालो. मी ‘यिन’च्या शंभर तरुणांची निवड करणार आहे. त्यांना माझ्या कंपनीत इंटर्नशिपची संधी देणार आहे. त्यानंतर त्यांना नोकरीही देणार आहे.’’  

स्पर्धा परीक्षा नोकरीचा राजमार्ग - पाटील
‘‘स्पर्धा परीक्षा म्हणजे तरुणाईसाठी नोकरीचा राजमार्ग आहे. स्पर्धा परीक्षांबाबतचा गैरसमज दूर करून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहा,’’ असे आवाहन ‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’चे संचालक सुनील पाटील यांनी केले. ते म्हणाले, ‘‘प्रशासकीय नोकरी आपल्याला आर्थिक स्थैर्य देतेच. पण, समाजात एका मोठ्या पदावर काम करण्याची संधीही देते. यामधून समाजातील विविध घटकांची सेवा केल्याचे समाधानही मिळते. विविधतेने नटलेल्या भारतातील जनतेसाठी सक्षम प्रशासन महत्त्वाचे आहे. म्हणूनच या सेवांमधून थेट जनतेशी संपर्क येतो. त्यांच्यात राहून त्यांच्या सहभागातूनही कामांचा आनंद घेतो येतो. स्पर्धा परीक्षांसाठी त्या-त्या वर्षीच्या परीक्षा आणि पूर्वीच्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण करा. सातत्यपूर्ण अभ्यासाला नियोजनाची जोड दिली, तर परीक्षेत नक्कीच यशस्वी व्हाल.’’

पुणे शहर डिजिटल करणार - जगताप
‘‘शहराला स्मार्ट सिटी बनविताना ऑनलाइन सुविधांचा वापर कसा वाढेल, यावर काम सुरू आहे. महापालिकेच्या सर्व विभागांतील ३५ टक्के काम हे ऑनलाइन झाले असून, काही दिवसांनी सर्व व्यवहार ऑनलाइन होतील,’’ अशी माहिती ‘पुणे स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली.  ते म्हणाले, ‘‘आपले शहर स्मार्ट कसे करता येईल, यावर जनतेची मते महत्त्वाची आहेत. विशेषत- ऑनलाइन पद्धतीचा वापर लोकांमध्ये वाढला पाहिजे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरिकांना सर्व सुविधा ऑनलाइन कशा देता येतील, याचा प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणजे महापालिकेतील काही विभागांत ऑनलाइन व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.’’

इंटरनेट आणि माहिती-तंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर या गोष्टी सायबर विश्‍वात महत्त्वाच्या आहेत. मात्र, असे होताना दिसत नाही. सायबर गुन्ह्यांसह सायबर दहशतवादही वाढला आहे. अशा वेळी आपण सायबर सुरक्षा कशी घ्यावी, हे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रातही तरुणांसाठी मोठ्या संधी आहेत. यामध्ये तुम्हाला करिअरलाही वाव आहे. देशामध्ये डिजिटल इंडियाचा प्रभाव वाढतोय. याला सरकारकडून स्वीकृती आहे. मात्र, अनेक लोक यातून फसविले गेले आहेत. त्यामुळे याचा वापर योग्यरीत्या कसा करता येईल, याला महत्त्व द्यावे.
- बालसिंग राजपूत, अधीक्षक, राज्य सायबर गुन्हे विभाग

आयुष्यात जोखीम घेण्याची तयारी ठेवा. आज उद्योगक्षेत्रात खूपशा संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. समर यूथ समिटच्या माध्यमातून असे व्यासपीठ निर्माण करता येईल. खासकरून स्वयंरोजगाराबद्दल तरुणांना मार्गदर्शन मिळाले, तर ते स्वयंरोजगाराकडे वळतील. मात्र, तरुण-तरुणींनी व्यवसाय करण्याची मानसिकता स्वत-मध्ये निर्माण करावी. तरुणाईने करिअरशिवाय आपल्याला आवडेल ती कौशल्येही आत्मसात केली पाहिजे.
- डॉ. राम गुडगिला, कॉर्पोरेट कन्सल्टंट

कौशल्याधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. भविष्यात तंत्रज्ञान बदलताना काही रोजगार नष्ट होतील आणि नवे रोजगार निर्माण होतील. यामुळे युवा पिढीने स्वत-ला काळाप्रमाणे अपडेट ठेवावे. स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत संधी उपलब्ध आहे. त्यासाठी निधीही मिळत आहे. अभिनव कल्पना घेऊन उभ्या असलेल्या युवकांना संधी दिली पाहिजे. अशा नवउद्योजकांना संधी मिळाली, तर नक्कीच देशातील नवोदित पिढीतून उद्योजक घडतील आणि देश महासत्ता होऊ शकेल.
- दीपक शिकारपूर, आयटी तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com