खडकी दारूगोळा कारखान्यातील लाचखोर व्यवस्थापकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

डीलरकडून लाच घेण्यासाठी शहाने २०१० ते २०१६ या कालावधीत स्वतःच्या आणि कुटुंबासह काही कर्मचाऱ्यांच्या नावाने बँकेत जॉइंट अकाउंट उघडली होती. त्यामध्ये डिलरकडून ३२ लाख ६७ हजार ६०० रुपयांची लाच घेण्यात आली आहे.

पुणे : खडकी येथील दारूगोळा कारखान्यातील विपणन आणि निर्यात विभागाचा कनिष्ठ व्यवस्थापक निरंजन सी. शहा याच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परवानाधारक पिस्तुल बाळगणाऱ्यांना काडतुसदेखील परवानाधारक खासगी विक्रेत्यांकडून घ्यावी लागतात. खडकी दारूगोळा फॅक्टरीमधून हे नोंदणीकृत डिलर काडतुसे विकत घेत असतात. पिस्तुल विक्रेत्यांना काडतुस देण्यासाठी कनिष्ठ व्यवस्थापक शहा हा लाच स्वीकारत होता. त्याच्याविरुद्ध खडकी दारूगोळा डेपोच्या  सीबीआय-एसीबीच्या पुणे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षात हा अधिकारी स्वतःसह नातेवाईक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात लाच स्वरुपातील रक्कम भरण्यास सांगत होता. 

पुण्यासह गुजरातमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सीबीआय-एसीबीकडून ही कारवाई सुरू होती. गेल्या सहा वर्षांत काडतुस विकत देताना नियमांमध्ये तडजोड करण्यासाठी शहा लाच स्वीकारत होता. डीलरकडून लाच घेण्यासाठी शहाने २०१० ते २०१६ या कालावधीत स्वतःच्या आणि कुटुंबासह काही कर्मचाऱ्यांच्या नावाने बँकेत जॉइंट अकाउंट उघडली होती. त्यामध्ये डिलरकडून ३२ लाख ६७ हजार ६०० रुपयांची लाच घेण्यात आली आहे. याबाबत एका डिलरने सीबीआय-एसीबीकडे तक्रार केली. तसेच काही माहिती सीबीआय-एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मिळविली. त्यानंतर शहा याच्यासह त्याला मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.