चैत्रपालवी - चैतन्य, नवनिर्मितीचं प्रतीक

श्रीकांत इंगळहळ्ळीकर, (लेखक वनस्पती अभ्यासक आहेत)
सोमवार, 3 एप्रिल 2017

गुढीतला हिरवा शालू, कडुलिंबाची- आंब्याची डहाळी चैत्रपालवीचं प्रतीक आहे, तर साखरेची गाठी फुलातल्या गोड रसाचं प्रतीक आहे. एकूणच, उंच उभारलेली गुढी हे चैत्रपालवीने फुललेल्या वृक्षाचं म्हणजेच चैतन्याचं, नवनिर्मितीचं प्रतीक असतं.

पानी फुलला, सुमनि बहरला
माझ्या अंगणि जरि तरू वठला
शुष्क डहाळीत अंग मोडिती
कोंभ नवे इवले,
आणखी एक पान गळले
झुळूक आणखी एक

- वा. रा. कांत

शिशिरानं पानगळ करून तरूची गात्रं शिथिल केलीत, की त्याचा प्राणही घेतलाय, याचं भय हळव्या कविमनाला व्यथित करतं. फॉल, पानगळ, पाचोळा या तरूला क्षय अवस्थेकडे नेणाऱ्या प्रतिमा सर्व प्रतिभावंतांच्या काव्यांत दिसतात. ही क्षयावस्थाच नवनिर्मितीची चाहूल देते. अमावस्येतून पौर्णिमा, रात्रीतून दिवस, ग्रीष्मातून वर्षा, शिशिरातून वसंत आणि मरणातून जन्म हा निसर्गातला चक्रनेमीक्रम शुष्क डहाळीवर डोकावणाऱ्या पर्णकोंबातून साकारतो. गळलेल्या पानांच्या व्रणातूनच नव्या पानांचे कोंब डोकावतात, हे तर कवीनं सांगितलेलं वनस्पतिशास्त्रच की!

पान म्हणजे झाडाचा सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करण्याचा अवयवच आहे; पण तो वर्षातून एकदा बदलावा लागतो. काही झाडं वर्षभर सतत थोडीथोडी पानं बदलत असतात. अशांना सदाहरित वृक्ष म्हणतात. काही झाडं वर्षातून एकदाच जुनी पानं गाळून नवी वाढवतात. अशांना पानगळी वृक्ष म्हणतात. रुद्राक्षाच्या सदाहरित झाडांची आणि बदामाच्या पानगळी झाडांची पानं पिकून गळताना गडद लाल होतात, अन्यथा सगळ्या ‘पिकल्या पानांचा रंग की हो पिवळा’च असतो.

सदाहरित वृक्षांना नवी कोवळी पालवी वर्षभर सतत येत असते. पानगळी वृक्षांना मात्र नवी पालवी पानगळीनंतर एकदाच चैत्र महिन्यात येते. काही मोजक्‍या पानगळी वृक्षांची कोवळी पालवी लालसर किरमिजी रंगाची असते. कुसुंबी रंगाचं नावच कुसुंब वृक्षाच्या कोवळ्या पालवीच्या रंगावरून आलं आहे. या नाजूक रंगीत पालवीचं सौंदर्य फुलांपेक्षाही थक्क करणारं असतं. सीता अशोक, टेम्बुर्णी, धूप, तमालपत्र या झाडांची चैत्रपालवी आकर्षक लाल रंगाची असते. पान पूर्ण आकारात वाढलं, की त्याचा रंग हिरवा होतो.

पिंपळवर्गीय झाडांच्या कोवळ्या पानकळ्यांवर गुलाबी रंगाचं संरक्षक आवरण (स्टिप्यूल) असतं. ही आवरणं पिंपळाच्या रंगीत पानांचं सौंदर्य आणखीनच खुलवतात. नवी पानं उलगडल्यावर ही आवरणं गळून पडतात. चैत्र पालवीपाठोपाठच पानगळी वृक्षांवर रंगरसगंधांनी भरलेली फुलं उमलतात. मधुमासाच्या स्वागताचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी म्हटलंय,

‘‘जैसे रुतुपतीचे द्वार। वनश्री निरंतन
वोळगे फळभार। लावण्येसी’’

म्हणूनच गुढी उभारून वसंतोत्सव साजरा केला जातो. गुढीतला हिरवा शालू, कडुलिंबाची- आंब्याची डहाळी चैत्रपालवीचं प्रतीक आहे, तर साखरेची गाठी फुलातल्या गोड रसाचं प्रतीक आहे. एकूणच, उंच उभारलेली गुढी हे चैत्रपालवीने फुललेल्या वृक्षाचं म्हणजेच चैतन्याचं, नवनिर्मितीचं प्रतीक असतं.

वा. रा. कांतांच्या कवितेत गळलेल्या पानांच्या प्रतिमेतून सुखी आयुष्याचा कानमंत्रच आहे. आयुष्य म्हणजे तर क्षणांची पानझडच! आलेल्या क्षणात जगा, त्यांना कवटाळू नका. क्षणांना हसता हसता सरू द्या, कारण क्षणांच्या पानझडीतच अक्षयपण दडलेलं आहे. जीवनाचं तत्त्वज्ञान सामान्यांपर्यंत पोचवणं हीच तर कवितेची प्रतिभा!

खुशाल गळता? गळा दळांनो
हसत सरा माझिया क्षणांनो
बघे क्षणांच्या पानझडीत मी
अक्षयपण उमले
आणखी एक पान गळले
झुळुक आणखी एक

Web Title: chaitrapalvi